मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही उभा राहिला आहे. ‘न्यूटन’ सिनेमा हा ‘सिक्रेट बॅलट’ या इराणी सिनेमाची कॉपी असल्याचा आरोप होत आहे. यावर ‘न्यूटन’चे दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी मौन सोडलं आहे. ‘न्यूटन’ आणि ‘सिक्रेट बॅलट’मध्ये काहीही साम्य नसल्याचे मसुरकर यांनी स्पष्ट केले आहे.


“न्यूटन सिनेमाची कथा मी 2013 साली लिहिली होती आणि 8 महिन्यानंतर मयांक तिवारी यांनी पटकथेवर कामही करण्यास सुरुवात केली होती.”, असे अमित मसुरकर यांनी सांगितले. शिवाय, “न्यूटनमधील कथेचा उद्देश आपल्या लोकशाहीतील अशा समूहाबद्दल चर्चा करण्याचा आहे, ज्यांना मतदान करण्याची इच्छा आहे. ही कथा माझी आहे. ‘सिक्रेट बॅलट’बाबत काही माहिती नव्हतं.”, असेही त्यांनी स्पष्ट केले.



“मला वाटतं शूटिंग सुरु होण्याच्या दोन दिवस आधी कुणीतरी मला म्हटलं होतं की, इराणी सिनेमा पाहिलाय का? मी त्या सिनेमाच्या क्लिप्स ऑनलाईन पाहिल्यात आणि त्या सिनेमाचा आमच्या सिनेमाशी काहीही साम्य नाही.”, असे अमित मसुरकर यांनी सांगितले.

“इराणी सिनेमा ‘सिक्रेट बॅलट’बद्दल मला काहीही माहित नव्हतं. मात्र, ज्यांना वाटतं की यात साम्य आहे, त्यांनी दोन्ही सिनेमे पाहावीत.”, असेही ते म्हणाले.

ऑस्कर 2018 साठी भारताकडून ‘न्यूटन’ सिनेमाची निवड झाली आहे. हा सिनेमा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे.