मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गुरुदासपूरमधील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचं तिकीट भाजपने विनोद खन्नांच्या पत्नी कविता यांना न दिल्याने, त्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र कविता खन्ना यांनी फेसबुक पोस्टमधून या चर्चा धुडकावून लावल्या आहेत.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील गुरुदासपूरमधून विनोद खन्ना भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. खन्ना यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी स्वर्ण सिंग सलारिया यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे विनोद खन्नांच्या पत्नी कविता नाराज झाल्याच्या चर्चांना ऊत आला. त्यावर कविता खन्ना यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपलं मत व्यक्त केलं आहे.
'माझ्या पतीच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने माझी निवड न केल्यामुळे मी नाराज आहे? अजिबात नाही. माझा वरिष्ठांवर पूर्ण विश्वास आहे. जे काही होतं, ते चांगल्यासाठीच होतं. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सल्लागार यांच्यावर भरोसा आहे. प्रथम देश, त्यानंतर पक्ष आणि अखेरीस स्वतः या तत्त्वाचं पालन भाजप करतं. ज्यांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची निवड केली, त्यांनी गुरुदासपूर, पंजाब आणि भारतासाठी चांगलंच केलं आहे. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करते.' असं कविता खन्ना म्हणतात.
'गेल्या काही काळात माझा वैयक्तिक विकास झाला आहे. मला जे काही मिळालं आहे, त्यासाठी मी जीवनाचे भरभरुन आभार मानते. माझे गुरु श्री श्री रवी शंकर, मला पाठिंबा आणि प्रेम देणाऱ्या सर्वांचे आभार' असं कविता खन्ना यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.
विनोद खन्नांच्या मृत्यूनंतर उमेदवारी न दिल्याने पत्नी भाजपवर नाराज?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 09:59 AM (IST)
काहीच दिवसांपूर्वी स्वर्ण सिंग सलारिया यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे विनोद खन्नांच्या पत्नी कविता नाराज झाल्याच्या चर्चांना ऊत आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -