अमेरिकच्या 'न्यूयॉर्क टाइम्स' वृत्तपत्राकडून लतादीदींचा अपमान
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2016 07:27 AM (IST)
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या तन्मय भटच्या व्हिडीओवरुन सध्या जोरदार वाद होत आहे. त्यातच आता अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा 'सो कॉल्ड सिंगर' अर्थात 'तथाकथित गायिका' असा उल्लेख केल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. तन्मय भटविरोधातील बातमीचं वृत्तांकन करताना न्यूयॉर्क टाइम्सने लता मंगेशकरांचा उल्लेख तथाकथित गायिका असा केल्याने भारतीय वाचकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सने लता मंगेशकर यांचाच नाही, तर तमाम भारतीयांचा अपमान केल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स‘ने वृत्तात म्हटलं आहे की, "तन्मय भटने शिवराळ भाषेत असलेला हा व्हिडीओ स्नॅपचॅटवर तयार केला आहे. भटने या अपच्या फेस स्वॉप फीचरचा वापर करत भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूडमधील तथाकथित पार्श्वगायिका लता मंगेशकर यांची नक्कल केली आहे." या वृत्तानंतर ट्विटरवर 'न्यूयॉर्क टाइम्स'विरोधात टीकेची झोड उठली आहे. संबंधित बातम्या