मुंबई : 'नेटफ्लिक्स'वर वेब सीरिज आणि सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यातही एका मित्राने चार स्क्रीन्सचं सबस्क्रिप्शन घेऊन आठ-दहा जणांनी 'जुगाड' करत नेटफ्लिक्स पाहणंही नवीन नाही. पैसे वाचवण्यासाठी केलेली ही 'यारीदोस्ती' नेटफ्लिक्सला चांगलीच महागात पडत आहे. त्यामुळे लॉगइन क्रेडेन्शिअल्स अवैधपणे शेअर करण्याला चाप बसण्याची शक्यता आहे.

यूकेमधील 'सिनमीडिया' या कंपनीने आर्टिफिशअल इन्टेलिजन्सचा वापर करुन एक उपाय शोधला आहे. त्यामुळे सर्व्हिस प्रोव्हायडर्सना अॅक्टिव्ह अकाऊण्ट्सकडून होणारं पासवर्डचं अवैध शेअरिंग ट्रॅक करता येणार आहे. एक अकाऊण्ट किती सिस्टमवर अॅक्टिव्ह आहे, याची माहिती या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळणार आहे. अशावेळी सर्व्हिस प्रोव्हाईडर तुमचे अकाऊण्ट बंदही करु शकतात.

नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन यांनी अद्याप या सॉफ्टवेअरच्या वापराबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र आतापर्यंत मल्टिपल यूझर्सनी एकच अकाऊण्ट वापरल्यामुळे या व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपन्यांना बसलेला फटका बघता त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुम्ही कुटुंबीय किंवा रुममेट्ससोबत अकाऊण्ट पासवर्ड शेअर केलात, तर कंपनीला आक्षेप नसेल. कारण लोकेशन ट्रॅक करुन एकाच परिघातील यूझर्सवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र दूर राहणाऱ्या मित्रांसोबत तुम्ही पासवर्ड शेअर केलात, तर तुम्हाला ईमेल आणि मोबाईलद्वारे अलर्ट पाठवून अकाऊण्ट बंद केलं जाऊ शकतं.