मुंबई : शेजाऱ्यांशी होणारे वादविवाद सर्वसामान्यांसाठी नवीन नाहीत. मात्र बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधातही तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. अवैधपणे बसवलेला इलेक्ट्रिक बोर्ड हटवण्याची मागणी शेजाऱ्याने केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने शर्मा कुटुंबाला नोटीस बजावली आहे.

मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या बद्रिनाथ टॉवरमध्ये अनुष्का सहकुटुंब विसाव्या मजल्यावर राहते. मात्र पॅसेजमध्ये शर्मा कुटुंबाने अवैधपणे इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्याची तक्रार बद्रिनाथ टॉवरचे माजी सेकेट्ररी सुनिल बत्रा यांनी केली आहे.

सुनिल बत्रा यांनी 6 एप्रिलला पत्र लिहून महापालिकेकडे ही तक्रार केली आहे. बद्रिनाथ टॉवरमध्ये सोळावा आणि सतरावा मजला बत्रा यांच्या मालकीचा आहे. शर्मांनी बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक बॉक्सविरोधात बत्रा यांनी आधी अग्निशमन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना महापालिकेकडे तक्रार करण्यास सुचवण्यात आलं.

बत्रांच्या तक्रारीनंतर महापालिकेने शर्मांना नोटीस बजावली आहे. मात्र आपल्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अनुष्काने केला आहे. आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतरच पॅसेजमध्ये इलेक्ट्रिक बॉक्स बसवल्याचा दावा अनुष्काने केला आहे.

'पालिका अधिकाऱ्यांनी त्याचं परीक्षण केल्यानंतर संबंधित इलेक्ट्रिक बॉक्स अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं सांगितलं. शर्मा कुटुंबाने हा बॉक्स तात्काळ हटवावा' अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांनी शर्मांना दिल्याचा दावा बत्रा यांनी 'मुंबई मिरर'कडे केला आहे.

त्याशिवाय पॅसेजमध्ये लाकडी कपाट ठेवणे, इमारतीच्या पॅराफिटवर एसीच्या शाफ्टचं अतिरिक्त वजन टाकणे यासारख्या गोष्टीही शर्मा कुटुंबीयांनी केल्याचं बत्रा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महापालिका अनुष्का शर्माविरोधात काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.