मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. मात्र दिग्दर्शक प्रियदर्शन राष्ट्रीय पुरस्कारांचे ज्युरी म्हणजे परीक्षक असल्यामुळेच अक्षयला हा पुरस्कार मिळाला, या आशयाचं सूचक ट्वीट दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामीने केलं आहे.


'नानावटी केस ही भारतातील अखेरची ज्युरी ट्रायल होती. ज्युरी पद्धत बंद करण्याची आणखीही काही कारणं असावीत.' असं म्हणत अरविंद स्वामीने नाव न घेता तिरकस बाण सोडले आहेत. अरविंदचा 'बॉम्बे' हा चित्रपट 22 वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये फारसा दिसला नाही.


प्रियदर्शन आणि अक्षयकुमार यांच्या जोडीचे हेराफेरी, भूलभूलैया, गरम मसाला, भागमभाग, खट्टा मीठा, दे दनादन यासारखे अनेक चित्रपट गाजले आहेत. यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या परीक्षकांमध्ये प्रियदर्शन यांचा समावेश असल्याने दोघांचे संबंध जोडले जात आहेत.

26 वर्षांच्या कारकीर्दीत अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार


26 वर्षांच्या कारकीर्दीत खिलाडीकुमारला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र दुसरीकडे, आमीर खानची 'दंगल' मधील किंवा बिग बींची 'पिंक' चित्रपटातील व्यक्तिरेखा तितकीच ताकदीची असताना अक्षयला सन्मानित केल्याने काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

त्याचप्रमाणे 'एअरलिफ्ट'सारख्या चित्रपटात अक्षयने दर्जेदार अभिनय केला असताना त्याचा सन्मान 'रुस्तम'साठी का झाला, याबाबत सोशल मीडियावर काही यूझर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

प्रसिद्ध नानावटी केसवर आधारित रुस्तम या चित्रपटात अक्षय कुमारने नेव्ही ऑफिसर रुस्तम पावरी ही भूमिका साकारली होती. आपल्या अनुपस्थितीत पत्नीला एका पुरुषाने भुलवल्यानंतर ‘रुस्तम’ने त्याची केलेली हत्या आणि त्याची देशभक्ती या विषयावर चित्रपटाची कथा आधारित आहे. रुस्तममध्ये अक्षयसोबत एलियाना डिक्रुज, इशा गुप्ता, उषा नाडकर्णी हे कलाकार झळकले होते.

गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारचे हॉलिडे, बेबी, स्पेशल 26, एअरलिफ्ट यासारखे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. सुरुवातीच्या काळात अॅक्शन हिरो अशी ओळख असलेला खिलाडी कुमार नंतर चरित्र भूमिकाही साकारताना दिसला. अक्षय कुमारचं सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंगही प्रचंड असून त्याचे अनेक सिनेमे शंभर कोटींच्या क्लबमध्ये गेले आहेत.

दिग्दर्शक प्रकाश झा परीक्षक असताना अभिनेता अजय देवगनला (गंगाजल, अपहरण सारखे दोघांचे गाजलेले चित्रपट) किंवा रमेश सिप्पी परीक्षक असताना बिग बी (शोले) यांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणं जितकं योगायोगाचं आहे, तितकंच अक्षय-प्रियदर्शन जोडी एकत्र येणं, अशा मिष्किल टिपण्याही सोशल मीडियावर केल्या जात आहेत.

26 वर्षांच्या कारकीर्दीत फिल्मफेअर, स्टार स्क्रीन, आयफा सारखे लोकप्रिय पुरस्कार पटकावणाऱ्या अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी हुलकावणी दिली. 2011 मध्ये त्याचा ‘पद्मश्री’ने गौरव करण्यात आला होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.

यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा दबदबा पाहायला मिळाला. कासव या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची शर्यत जिंकत, अव्वल क्रमांकाचं सुवर्णकमळ पटकावलं.

संबंधित बातम्या :


मराठी चित्रपटाची पाचव्यांदा 'सुवर्णकमळा'वर मोहर


National Film Awards : 'कासव'ने पुरस्कारांची शर्यत जिंकली