Nayana Apte : अष्टपैलू अभिनेत्री नयना आपटे (Nayana Apte) यांच्या कला योगदानाला सांस्कृतिक मानवंदना देण्यासाठी मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नयना आपटेंच्या कारकीर्दीला 70 आणि त्यांनी वयाच्या पंचाहात्तरीत प्रवेश केल्याबद्दल संस्कृती सेवा न्यास आणि सवाईगंधर्व यांच्या संयुक्त विद्यमाने 'अमृतनयना' हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांच्या हस्ते नयनाताईंचा सन्मान
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ (Ashok Samel) यांच्या हस्ते नयनाताईंचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पंडित मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर, अपर्णा अपराजित यांनी गीतं सादर केली. तर गायत्री दीक्षित यांनी नृत्याविष्कार सादर केला. मंगला खाडिलकर यांनी नयनाताईंची मुलाखत घेतली. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तपस्या नेवे आणि अमेय रानडे यांनी केलं. यावेळी नयना आपटे यांच्या 'प्रतिबिंब' पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं प्रकाशनही करण्यात आलं. पत्रकार नागेश धावडे या पुस्तकाचं शब्दांकन करतायत. तर, जाऊ मी सिनेमात? या शांता आपटेंच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशनही यावेळी पार पडलं.
नयना आपटेंच्या कला योगदानाला सांगीतिक वंदन
वयाच्या चौथ्या वर्षापासून नयना आपटे यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपट व रंगाभूमीवर कामे करीत विविधांगी भूमिका साकारल्या. बदलत्या काळाप्रमाणे बदल स्वीकारत सर्व माध्यमांमध्ये टिकून राहत त्यांची वाटचाल आजही सुरूच आहे. ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या रंगभूमीवरील कारकीर्दीला 70 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या गुणी अभिनेत्रीला मानवंदना तसेच त्यांच्या कारकीर्दीच्या सन्मानार्थ मुंबईत ‘अमृतनयना’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नयना आपटेंबद्दल जाणून घ्या.. (Who is Nayana Apte)
आपल्या आईकडून कलेचा सक्षम वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनी मालिका, चित्रपट, रंगभूमी, डबिंग अशी चौफेर मुशाफिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या कर्तबगारीने यश, कीर्ती मिळवीत असताना अभिनेत्री नयना आपटे यांनी अनेक अडथळे पार केले. त्यांच्या आयुष्याचा आणि कलेचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. हा प्रवास आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे.
आपल्या समर्थ अभिनयाने आणि सुंदर गायनाने शांता आपटे (Shanta Apte) यांनी रूपेरी पडद्यावर राज्य केले. त्यांच्या चित्रपटांनी त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली. असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करत चित्रपटाच्या इतिहासात “शांता आपटे” हे नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं गेलं. साहजिकच शांता आपटे यांची कन्या म्हटल्यावर नयना आपटे यांच्यावर तशी फार मोठी जबाबदारी होती. अभिनया बरोबरच आपल्या कष्टाने त्यांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत शिकून घेतले. त्याचप्रमाणे नृत्यशिक्षणही त्यांनी घेतले.
संंबंधित बातम्या