'रईस'च्या रिलीजसाठी एक रुपयाही देणार नाही : फरहान
एबीपी माझा वेब टीम | 30 Oct 2016 02:16 PM (IST)
मुंबईः 'रईस'च्या रिलीजसाठी एक रुपयाही देणार नाही, अशा शब्दात अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तरने मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. रिलीजसाठी आपण कसलीही तडजोड करणार नसल्याचं फरहानने म्हटलं. 'रईस' सिनेमात शाहरुख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. मात्र मनसेने पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. 'ऐ दिल है मुश्किल'लाही विरोध करण्यात आला. मात्र आर्मी फंडला 5 कोटी रुपये देण्याची तडजोड करुन सिनेमा रिलीज करण्यात आला. फरहानने मात्र आपण अशा प्रकारची कसलीही तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे. आर्मीने निर्मात्यांकडून दिले जाणारे पैसे तातडीने नाकारले. त्यामुळे आपण एक रुपयाही देणार नसल्याचं फरहानने सांगितलं. 'ऐ दिल है मुश्किल'चे निर्माते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बैठकीतील तोडग्यानंतर मनसेचा चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा विरोध मावळला. पाकिस्तानी कलाकार माहिरा खानचा विरोध आणि फरहानचं स्पष्टीकरण, यावर आता मनसेकडून काय भूमिका घेण्यात येते, त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. संबंधित बातम्याः