मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने पत्नीचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) मागवून हेरगिरी केल्याचा आरोप झाला. त्यानंतर त्याची पत्नी आलिया सिद्दीकीनेच या आरोपांवर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. आलियाने पती नवाझुद्दीन सिद्दीकीवर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत.


आरोपांमुळे नवाझसोबत मीसुद्धा वैतागले, त्यामुळे नाईलाजाने मला मौन सोडावं लागत आहे, असं आलिया सिद्दीकीने म्हटलं आहे.

'कालपासून मीडियामध्ये ज्या बातम्या दिसत आहेत, त्या पाहून नवाझसोबत मी सुद्धा अवाक झाले. यापूर्वीही माझ्या आणि नवाझविषयी मीडियामध्ये अनेक अफवा पसरत होत्या. अगदी तलाक (घटस्फोट) पासून आम्ही वेगळे राहत असल्याच्या वावड्या उठल्या. मात्र काल जी बातमी पसरली आहे, ती आम्हा दोघांसाठी त्रासदायक आहे. म्हणून नाईलाजास्तव मला मौन सोडावं लागलं' असं आलिया म्हणते.

ठाण्यातील सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं नाव


'गेल्या काही दिवसांपासून नवाझच्या आत्मचरित्रावरुनही गदारोळ झाला. नवाझ खरं बोलतो, हाच त्याचा दोष आहे. त्याच्या मनात कधीच असत्य नसतं. त्याला समजून घेण्याऐवजी चुकीचं ठरवलं जातं.' अशी खंतही आलिया सिद्दीकीने व्यक्त केली आहे.

'माझं आणि नवाझचं नातं 15 वर्ष जुनं आहे. नवाझ स्टार नसताना एका छोट्याशा घरातून आमच्या प्रेमाची गोष्ट सुरु झाली. त्यात अनेक चढउतार आले. दीर्घ काळाच्या रिलेशनशीपनंतर आम्ही लग्न केलं. नवाझने करिअरमध्ये नवी उंची गाठली. संसारात असलेली कमतरता शोरा आणि यानी या मुलांच्या आगमनाने पूर्ण झाली.' असं आलियाने सांगितलं.

'नवाझच्या वागण्यात मोकळेपणा आहे. मी हिंदू ब्राम्हण कुटुंबातून आले, तर तो मुस्लिम. मात्र त्याने कधीच स्वतःचा धर्म माझ्यावर लादला नाही.' असं पूर्वाश्रमीची अंजली सांगते.

'सीडीआर प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, त्याच्यावरचे आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्यामुळे नवाझ निर्दोष सिद्ध होईल, याची मला खात्री आहे. तो सेलिब्रेटी असल्यामुळे त्याला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे.' असा दावाही आलियाने केला.

काय आहे प्रकरण?

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 1 ने नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याची पत्नी आणि त्यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांना समन्स बजावलं आहे. पत्नीचे काँटॅक्ट्स आण ठावठिकाण्यावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाझने सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स मागवल्याची माहिती आहे.

वकील रिजवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनच्या पत्नीचे सीडीआर काढले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात हे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र तीन वेळा बोलावूनही अद्याप नवाजुद्दीन चौकशीसाठी आलेला नाही.

सीडीआर प्रकरणी आतापर्यंत खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली होती. सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

फेसबुक पोस्ट :



संबंधित बातम्या :

सीडीआर प्रकरण : खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

CDR लीक प्रकरण : व्हीआयपी नंबर समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय

CDR लीक प्रकरण : व्होडाफोनसह 7 मोबाईल कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात

कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक

महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक