मुंबई : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा भाऊ आणि नवोदित दिग्दर्शक शमशुद्दीन सिद्दीकीने एका प्रकाशन संस्थेविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे. स्त्री कलाकारांसोबत शमशुद्दीनची वागणूक आक्षेपार्ह असल्याचा दावा केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे.


'बोले चुडिया' या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन शमशुद्दीन सिद्दीकी करत आहे. यामध्ये नवाझुद्दीनसोबत अभिनेत्री मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहे. 'संबंधित मीडिया रिपोर्टमध्ये आपली अवमानकारक प्रतिमा उभी करण्यात आली आहे.' असं शमशुद्दीनने याचिकेत म्हटलं आहे.

'शमशुद्दीनच्या गैरवर्तनामुळे अनेक अभिनेत्रींनी चित्रपट सोडला' असा दावा संबंधित मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत शमशुद्दीनने त्यांना कोर्टात खेचलं. मात्र नवाझने अद्याप याप्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही.

राजेश आणि किरण भाटिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मे-जून महिन्यात या सिनेमाचं चित्रीकरण पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल. मौनीने अक्षयकुमारसोबत 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.