मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता आगामी 'रौतू का राज' चित्रपटात झळकणार आहे. 'रौतू का राज' चित्रपट ओटीटीवर 28 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याने कायमच वेगळ्या भूमिकांना हात घालून त्यांना न्याय दिला आहे, मग त गायतोंडे असो किंवा मग फैजल आदकारी. प्रत्येक पात्रावर जीव टाकणे, हे नवाजुद्दीनचं कौशल्य आहे. आता नवाजुद्दीन इन्वेस्टिगेटिंग ऑफिसरच्या भूमिकेत 'रौतू का राज' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
धर्मामुळे नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बॉलिवूडमध्ये भेदभाव झाला?
नवाजुद्दीन सिद्दीकी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान एका विशिष्ट धर्माशी संबंधित असल्याबद्दल बॉलिवूडमध्ये कसं वर्तन होतं, यावर भाष्य केलं आहे. बॉलिवूडमध्ये धर्म आणि प्रदेश तुमच्या यशाच्या आड येत नाहीत, असं नवाजुद्दीनने सांगितलं आहे. एका पॉडकास्टमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, बाकीच्या समाजाने सर्व धर्मांचा आदर कसा करायचा, हे बॉलिवूडकडून शिकलं पाहिजे. अभिनयाच्या बाबतीत अनुपम खेरही नसीरुद्दीन शाह यांचा खूप आदर करतात. 'अ वेन्सडे' चित्रपटाचा उल्लेख करून त्याने या दोन अभिनेत्यांमधील परस्पर आदराचं उदाहरण दिलं आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने स्पष्टच सांगितलं...
नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, मी या इंडस्ट्रीचा एक भाग आहे. माझा देश सुंदर आहे. मला जे प्रेम आणि आदर इथे मिळतो, तो इतर कोठेही मिळत नाही. तुम्ही कोणत्याही भागातून आलेले असले तरी, इथे खूप प्रेम मिळतं. लोकांनी मला दिलेल्या प्रेमामुळे मी सामान्य लोकांमध्ये राहून खूप आनंदी आहे. हे तुम्हाला जगात कुठेही दिसणार नाही. मी आपल्या देशात गावखेड्यात मी फिरलो आहे. बातम्यांमध्ये काय दाखवतात ते माहीत नाही, पण आपल्या देशातील लोक सुंदर आणि निरागस आहेत.
रौतू का राज चित्रपट 28 जूनला ओटीटीवर
'रौतू का राज' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने दीपक नेगीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा रौतू या गावाभोवती फिरते. या गावातील लोकांचा असा विश्वास आहे की, इथे कुणी मरत नाही, तर लोक म्हातारे झाल्यावरच मरतात. मात्र शतकांनंतर येथे एक हत्या झाली आणि दीपक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी या गावात पोहोचतो. 'एक हुशार पोलीस आळशी खुनाचा तपास करण्यासाठी आला आहे', असं चित्रपटाच्या प्रोमोमध्ये लिहिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :