मुंबई : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सायंस फिक्शन चित्रपट कल्कि 2898 एडी (Kalki 2898 AD) अखेर बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. चित्रपट रिलीज होताच पहिल्याच दिवशी अनेक विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. कल्कि 2898 एडी चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधी ऑनलाईन बुकींगच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे. आता बॉक्स ऑफिसवर चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच  दिवशी 200 कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. याशिवाय पहिल्या आठवड्यात हा चित्रपट 500 कोटींचा गल्ला जमवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


कल्कि 2898 एडी चित्रपट विक्रम रचण्यास सज्ज


कल्कि 2898 एडी चित्रपटात तगडी स्टार कास्ट ॲक्श आणि हिस्टॉरिकल ड्रामा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवसापासून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. कल्कि 2898 एडी चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचं बजेट किती तसेच प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन या कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं आहे, ते जाणून घ्या.


कल्कि 2898 एडी चित्रपटाचं बजेट 600 कोटी


कल्कि 2898 एडी चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. त्यानंतर आज अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, हा सर्वाधिक बजेट असणारा भारतीय चित्रपट आहे. कल्कि 2898 एडी चित्रपटाचं बजेट 600 कोटी आहे. या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पटानी अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या कलाकारांनी तगडं मानधन घेतलं आहे.


कल्कि 2898 एडी चित्रपटा कलाकारांचं मानधन किती?


अभिनेत्री दीपिका पादुकोण कल्कि 2898 एडी चित्रपटात सुमतीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दीपिका गर्भवती महिलेच्या भूमिकेत आहे. तिची संतान कल्कि 2898 युगात क्रांती घडवणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कल्कि 2898 एडी चित्रपटासाठी दीपिका पादुकोणने 20 कोटी मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.


अमिताभ आणि कमल हसन यांना किती फी मिळाली?


कल्कि 2898 एडी चित्रपटासाठी बिग बी अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार असून त्यासाठी त्यांनी 20 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. याशिवाय कमल हसन हे ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांनीही या भूमिकेसाठी 20 कोटी मानधन आकारलं आहे. अभिनेत्री दिशी पटानीही या चित्रपटाचा एक भाग असून तिला या चित्रपटासाठी तिला सर्वात कमी मानधन मिळालं आहे. या चित्रपटासाठी दिशा पटानीला फक्त एक कोटी रुपये मानधन मिळालं आहे.


प्रभासचं मानधन बिग बी, दीपिका आणि इतरांपेक्षा जास्त


कल्कि 2898 एडी चित्रपटासाठी बिग बी अमिताभ बच्चन, कमल हसन, दीपिका पादुकोण, दिशा पटानी आणि इतर कलाकारांच्या एकूण मानधनापेक्षा प्रभासने सर्वाधिक मानधन घेतलं आहे. खरंतर, प्रभासने या चित्रपटासाठी त्याची फी कमी केली असल्याची माहिती आहे. प्रभास चित्रपटांसाठी 150 कोटी रुपये मानधन घेतो, पण कल्कि 2898 एडी चित्रपटासाठी प्रभासने 80 कोटी रुपये घेतल्याचं मिडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.