नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचं शूटिंग सध्या सुरु आहे. या सिनेमात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. पण बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीच का? याचे उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

संजय राऊत गुरुवारी सोनू निगम, महिना चौधरी आणि लेसले लेविस यांच्या भारतीय कला महोत्सवात सहभागी झाले होते. त्यावेळी राऊत यांनी या सिनेमाबद्दल अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली.

सिनेमाविषयी सांगताना राऊत म्हणाले की, “पहिल्यांदा आम्ही सिनेमाचा ट्रेलर लॉन्च केला. हा ट्रेलरला 24 तासात 30 लाखापेक्षा जास्त पाहिला. आगामी काळात यात अजून वाढ होईल. या सिनेमाला संपूर्ण जगात चांगला प्रतिसाद मिळेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी इतर कोणत्या कलाकारांच्या नावाचा विचार झाला का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, त्यांनी तात्काळ नकार दिला. “नाही... या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी या एकमात्र अभिनेत्याच्या नावाचीच चर्चा होती.” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

या सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं असून, 23 जानेवारी 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल सोनू निगम म्हणाला की, “बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेसाठी ज्या अभिनेत्याची निवड झाली आहे, तो अभिनेता आपल्या देशातील शीर्ष अभिनेत्यांपैकी एक आहे. आणि जेव्हा एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या जीवनावर सिनेमाची निर्मिती होत असते. त्यावेळी त्याला वेगळी ओळख मिळते.”

दरम्यान, या कला महोत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल संजय राऊत यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच, “देशातील प्रमुख कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कलेचं प्रदर्शन केलं. त्यांच्या कलागुणांना सर्वांनीच प्रोत्साहन दिलं  पाहिजे,” अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

सिनेमाचा ट्रेलर पाहा