मुंबई : एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी पुन्हा एकदा आपल्या हृदयातील भळभळती जखम उघड केली आहे. ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्यापासून दूर पळते, ज्यांच्यावर खूप जास्त प्रेम करते, त्यांच्यापासून तर मैलभर लांब पळते, असं नाही केलं, तर जग मलाच पळवून लावतं, अशा शब्दात रेखा यांनी आपली दुखरी नस उलगडून दाखवली.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शुक्रवारी रेखा आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यश चोप्रा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आशाताईंना पाहून रेखा यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि त्या थेट आशाताईंच्या पाया पडल्या.
'यश चोप्रा आणि आशा भोसले या दोन व्यक्तींमुळे मी आज इथवर पोहचले. त्या माझ्या आयुष्याचा भाग आहेत. त्या अंतर्बाह्य सुंदर आहेत. मंगेशकर कुटुंबाकडून मी खूप काही शिकले आहे. त्यांच्या गाण्यांवर परफॉर्म करावं लागत असल्यामुळे मी आधी खूप घाबरायचे. मला नजरेतून एक्स्प्रेशन्स द्यावे लागायचे. पण त्यांच्याकडून कायम हसतमुख राहायला शिकले' असं रेखा म्हणाल्या.
रेखा यांच्याशिवाय जयाप्रदा, पद्मिनी कोल्हापुरे, पूनम धील्लन, परीणिती चोप्रा यासारख्या अभिनेत्री, प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक, यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा आणि अभिनेते जॅकी श्रॉफ सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात अनेक तारे-तारकांनी यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पाचव्या यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर आशा भोसले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आशाताईंनी आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आतापर्यंत लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रेखा आणि शाहरुख खान यांना यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
उघड्या पुन्हा जहाल्या.. रेखाने उलगडल्या हृदयातील जखमा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2018 04:05 PM (IST)
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शुक्रवारी रेखा आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यश चोप्रा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -