Nana Patekar : रुपेरी पडद्यावर झळकणारे सेलिब्रिटी असो किंवा क्रिकेटचं मैदान गाजवणारा प्लेस्टार असो. आपल्याकडे असणारी हिरोची संकल्पना थोडी बदलण्याची गरज आहे. तर खऱ्या रिअल हिरोपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. असाच एक खरा हिरो नाना पाटेकर (Nana Patekar) त्यांच्या आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. दरम्यान देशाच्या विरोधात बोलणारी मंडळी खूप आहेत, असं म्हणत नाना पाटेकरांनी नेत्यांना फटकारलं आहे.


'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाबद्दल एबीपी माझाशी बोलताना नाना पाटेकर म्हणाले,"आपले खरे हिरो हे जवान आणि शेतकरी आहेत. पण आपण कधी त्यांचा उल्लेखही करत नाही. 'जय जवान जय किसान' अशा घोषणा दिल्यानंतर आपण त्यांना विसरुन जातो. तर दुसरीकडे वैज्ञानिक हे आपल्याला माहितीच नाहीत. कोव्हॅक्सिनचा ज्यांनी शोध लावला त्या टिमचे मुख्य होते डॉ. बलराम भार्गव (Dr. Balram Bhargava). 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) या सिनेमात मी त्यांची भूमिका साकारत आहे. कोरोनाकाळातील वैज्ञानिकांचा संघर्ष प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळेल."


नाना पाटेकर पुढे म्हणाले,"जगातल्या बड्या कंपन्यांकडे पैशाचं मोठं बळ आहे. ते आपल्याकडे नाही. वेगवेगळ्या कंपन्यांना पैशे पुरवून भारताबद्दल वाईट कसं बोलायचं याच्यासाठी पैसे पुरवले जातात आणि तशी मंडळी आपल्याकडे खूप आहेत. स्वत:ला वेगवेगळी बिरुदं लावून आपल्या देशाच्या विरुद्ध ही मंडळी ओरडत असतात". 


भ्रष्टाचाराच्या ट्वीटबद्दल बोलताना नाना म्हणाले,"आपल्याकडे काही मंडळींचा भ्रष्टाचार हा पराकोटीला गेला आहे. दुसऱ्यांकडून पैसे घेऊन तुम्ही आमच्या सिनेमात काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं हे ठरवता याला काय अर्थ आहे. सोशल मीडियावर तर कोणीही कोणत्याही विषयावर व्यक्त होतं. त्यानंतर दंगे होतात.. कोणत्याही गोष्टीवर तुमचा धरबंध नाही. या मंडळींच्या या कृतीनंतर सेन्सॉरशिप हास्यास्पद वाटायला लागते. युट्यूब, गुगलवर ही मंडळी वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतात. त्यामुळे सर्वांना समान न्याय द्यायला हवा. पण आपल्या देशात हे होत नाही". 


'द व्हॅक्सिन वॉर'बद्दल बोलताना नाना म्हणाले,"नट म्हटल्यावर पाठांतर करणं सोपं आहे. पण हे पाठांतर व्यक्ती म्हणून तुमच्या अंतकरणामध्ये किती झिरपलं आहे ते महत्त्वाचं आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमातला एकही माणूस कलाकार वाटला ना तर तो आमचा दोष आहे. विवेक अग्निहोत्रीने फार छान पद्धतीने या सिनेमाची बांधणी केली आहे.


'द व्हॅक्सिन वॉर' कधी प्रदर्शित होणार? (The Vaccine War Release Date)


'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विवेक अग्निहोत्रींनी (Vivek Agnihotri) सांभाळली आहे. कोरोनाकाळीतील वैज्ञानिकांचा संघर्ष या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या 28 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन आणि अनुपम खेर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 



संबंधित बातम्या


The Vaccine War Trailer Out: विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सिन वॉर'चा ट्रेलर रिलीज; नाना पाटेकर, पल्लवी जोशी प्रमुख भूमिकेत