मुंबई : 'बिग बॉस'च्या पहिल्या पर्वाची स्पर्धक, अभिनेत्री बॉबी डार्लिंग उर्फ पाखी शर्माने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मात्र तिच्या पतीने हा विवाह हिंदू विवाह कायद्याअंतर्गत वैध आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. बॉबीपेक्षा तिचा पती 15 वर्षांनी तरुण आहे.


जन्माने पंकज शर्मा असला, तरी तो स्वतःची ओळख बॉबी डार्लिंग अशी सांगत असे. 2010 साली बॉबीने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केली होती. बॉबीची पाखी शर्मा झाल्यावर तिने बिझनेसमन रमणीक शर्माला दोन वर्ष डेट केलं. 2016 साली त्यांनी विवाहगाठ बांधली. मात्र जेमतेम वर्षभरातच कौटुंबिक हिंसाचार आणि अनैसर्गिक सेक्ससाठी दबाव टाकल्याची तक्रार बॉबीने पतीविरोधात केली होती.

बॉबीने वांद्र्यातील फॅमिली कोर्टात लग्न मोडण्यासाठी अर्ज केला आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये केलेल्या ओशिवऱ्यातील फ्लॅटचं गिफ्ट डीड रद्द करण्याची मागणीही तिने केली आहे. मात्र हिंदू विवाह कायद्यानुसार स्त्री आणि पुरुषातील विवाह कायदेशीर असतो, त्यामुळे आपला विवाह वैधच नाही, असा दावा बॉबीच्या पतीने केला आहे.

"रमणीक दारुच्या नशेत मला मारहाण करत असे. माझे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असल्याचा आरोप करत असे. त्याने माझी संपत्ती आणि पैसे बळकावले. शिवाय मुंबईतील फ्लॅटचा सहमालक बनवण्यासाठी रमणीक माझ्यावर दबाव टाकत असे," असं बॉबीने सांगितलं होतं.

बॉबी डार्लिंगने क्योंकि सास भी..., कसौटी जिंदगी की यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय फॅशन, चलते चलते, क्या कूल है हम सारख्या चित्रपटातही ती झळकली होती. वयाच्या 23 व्या वर्षाच्या आत 18 बॉलिवूडपटांमध्ये गे व्यक्तिरेखा साकारल्याचा रेकॉर्डही तिच्या नावे लिम्का बूकमध्ये नोंद आहे.