मुंबई : नागराज मंजुळे… सिनेमासारखं आयुष्य जगलेला हा माणूस… त्याच आयुष्याची गोष्ट त्याने सिनेमातून मांडली आणि रुपेरी पडद्यावर इतिहास घडवला…
हालगीच्या तालावर वाजत निघालेली सिनेमाची पोस्टर्स आणि त्या वरातीत भान हरपून नाचलेला नागराज. कधी काळी आपल्याही सिनेमाचं पोस्टर एवढ्या दणक्यात झळकेल हे स्वप्नातही त्याने पाहिलं नसेल.
फॅण्ड्रीतून मांडलेली जब्याची गोष्ट असेल किंवा मग आर्ची आणि परशाच्या प्रेमाचा सैराट अंदाज. नागराज जे जगला… जे पाहिलं… जे सोसलं आणि भोगलं तेच या सिनेमातून बाहेर आलं.
सैराटने बॉक्स अॉफिसवर छप्परतोड कमाई केली आणि नागराज मंजुळे सुपरस्टार झाला. बॉलिवूडकरांना धडकी भरवेल अशी कमाल या सिनेमाने करुन दाखवली.
हाच नागराज आता बॉलिवूडमध्ये पाऊल टाकतोय. आणि या सिनेमात त्याचा नायक आहे साक्षात अमिताभ बच्चन.
फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन नागराजने लहानपणापासून अमिताभसोबत त्याचं असलेलं नातं स्पष्ट केलय.
या फेसबुक पोस्टमध्ये नागराज असं म्हणतो की
जेव्हा दिवार सिनेमा पाहिला तेव्हा शर्टला गाठ मारुन शाळेत जायचो. मास्तरांचा मार खायचो पण ती गाठ सुटायची नाही. मित्राची माती वाहण्यासाठी वापरली जाणारी गाढवं गुपचूप पळवायचो आणि शोलेचा खेळ खेळायचो. अर्थात ज्याची गाढवं असायची तोच अमिताभ बनायचा. त्या खेळात सांभाची भूमिका माझ्या वाट्याला यायची पण मी खूश असायचो कारण त्या खेळाचं दिग्दर्शन माझ्याकडे असायचं.
याराना बघून गल्लीत सगळ्यांना ‘कच्चा पापड पक्का पापड’चा पाढा म्हणायला लावायचो.
सत्ता, शहेनशाह, लावारिस, कालिया, शराबी अशा कितीतरी सिनेमांच्या गोष्टी सांगून मित्रांचं मनोरंजन करायचो.
लहानपणापासून जे माझे सगळ्यात आवडते अभिनेते आहेत, ज्यांचे सिनेमे बघत बघत मी मोठा झालो तेच महानायक अमिताभ बच्चन आज माझ्या हिंदी सिनेमाचे मुख्य नायक आहेत. याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट काय असू शकते?
-नागराज मंजुळे
याला जर आपण नशिब किंवा भाग्य म्हणालो तर तो नागराजवर अन्याय ठरेल कारण नागराज नशिब आणि परिस्थितीशी दोन हात करुन इथवर आलाय.