न्यूयॉर्क : हॉलिवूडमधील देखण्या जोड्यांपैकी एक असलेल्या ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोलीच्या घटस्फोटाच्या
बातमीमुळे गेल्या वर्षापासून तमाम चाहतावर्ग नाराज होता. मात्र अँजेलिनाने त्यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबरी आणली आहे. तिने ब्रॅडसोबत विभक्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. हॉलिवूडची बित्तंबातमी देणाऱ्या अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी ही न्यूज दिली आहे.


ब्रॅड पिटने मद्यपान सोडल्यामुळे अँजेलिनाने त्याला दुसरी संधी देण्याचं ठरवलं आहे. अँजेलिना जोलीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याचं वृत्त आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा 'ब्रँजेलिना'ला एकत्र नांदताना पाहता येणार आहे. सप्टेंबर 2016 मध्ये अँजेलिनाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

लॉस अँजेलसला जाताना विमानात ड्रिंक्स घेतल्यानंतर ब्रॅड आणि त्यांचा मुलगा मॅडॉक्सचं भांडण झालं होतं. ब्रॅडच्या मद्यपानाच्या व्यसनाला कंटाळलेल्या अँजेलिनाने या घटनेनंतर थेट विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. सहा मुलांचा ताबा घेत अँजेलिना घराबाहेर पडली होती.

ब्रॅडने थेरपी घेऊन मद्यपानाच्या विळख्यातून सुटका करुन घेतली. त्यानंतर सहा मुलांच्या भविष्यासाठी ब्रॅड-अँजेलिनाने पुन्हा नतं जुळवण्याचा निर्णय घेतला. ब्रॅड-अँजेलिना यांना मॅडॉक्स (15), पॅक्स (13), जाहरा (12) शिलॉ (11) आणि 9 वर्षांची विविअन आणि नॉक्स ही 9 वर्षांची जुळी मुलं आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण प्रलंबित आहे, मात्र अँजेलिनाने ते पुढे सरकू दिलेलं नाही. त्यामुळे ते घटस्फोट घेणार नाहीत, असं त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं. अँजेलिनाचं प्रेम पुन्हा जिंकण्यासाठी ब्रॅडने कठोर मेहनत घेतल्याचंही अनेक जण सांगतात.