नागराज मंजुळे यांची बिग बींवर हिंदी भाषेत फेसबुक पोस्ट
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2017 06:09 PM (IST)
'दीवार' सिनेमा पाहिला, तेव्हा अमिताभप्रमाणे शर्टाला गाठ बांधून शाळेत जायचो. मार पडला, तरी सवय मोडली नाही, अशा शब्दात नागराज यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला
NEXT PREV
मुंबई : ज्याचे चित्रपट पाहत लहानाचा मोठा झालो, तो या शतकाचा महानायक माझ्या पुढच्या सिनेमाचा नायक आहे, अशा शब्दात प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. अमिताभचा दीवार चित्रपटातला फोटो शेअर करत नागराज यांनी हिंदी भाषेत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. 'दीवार' सिनेमा पाहिला, तेव्हा अमिताभप्रमाणे शर्टाला गाठ बांधून शाळेत जायचो. मार पडला, तरी सवय मोडली नाही, अशा शब्दात नागराज यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शोले, याराना, डॉन, कुली, सत्ते पे सत्ता, शहेनशाह, लावारिस, कालिया, शराबी अशा अनेक चित्रपटांचा उल्लेख करत नागराज यांनी आपलं बालपण समृद्ध करणाऱ्या बिग बींचे आभार व्यक्त केले. सैराट आणि फँड्री या सिनेमांच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे नव्या सिनेमावर काम करत आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन दिसणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून नागराज बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ज्याचे चित्रपट पाहत लहानाचा मोठा झालो, तो या शतकाचा महानायक माझ्या पुढच्या सिनेमाचा नायक आहे, यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट काय असू शकते, असं म्हणताना नागराज यांचा आनंद शब्दात मावेनासा झाला आहे.