'सैराट सिनेमा लोकांना आवडणार, हे पहिल्या दिवसापासून माहित होतं. भारतीय लोक जगणं गांभीर्याने घेत नाही, मात्र सिनेमे गांभीर्याने घेतात.' असं म्हणतं दिग्दर्शक नागराज यांनी प्रेक्षकांचेही कान टोचले.
नागराज मंजुळे यांनी कट्ट्यावर आपली परखड मतं व्यक्त केली. 'बाईला दुय्यम लेखण्यासाठी या व्यवस्थेच अनेक चिन्हं आहेत. मी सिनेमा तयार केला आहे. तो चांगला की वाईट हे प्रेक्षक ठरवतील. या सिनेमाबाबत काय चर्चा सुरु आहे याचा मी विचार करीत नाही.' असंही मंजुळे म्हणाले.
'असा शूट केला सैराटचा शेवटचा सीन'
सैराट सिनेमातील शेवट आणि त्यातील त्या चिमुकल्याचा अभिनय हा अजूनही चर्चेचा विषय आहे. याच शेवटच्या सीनचं गुपितही नागराज यांनी कट्ट्यावर उघड केलं. 'सैराटमधील चिमुकला प्रचंड रडका आहे, त्यामुळे शूटिंगसाठी मोठी कसरत झाली. शेवटचा सीन हा पूर्णपणे या चिमुकल्याच्या हावभाव आणि देहबोलीवर अवलंबून होता. त्यामुळे हा सीन शूट करताना आमचं संपूर्ण कसब पणाला लागलं. त्यामुळे या सीनसाठी आम्ही एक युक्ती केली.'
'या चिमुकल्याला खेळण्यासाठी एक गाडी दिली आणि तिचा रिमोट कंट्रोल मी माझ्याकडे ठेवला. त्यासाठी मी पहिल्यांदाच आयुष्यात रिमोटची गाडी शिकलो. जेव्हा मी त्याच्या जवळ ती गाडी न्यायचो त्यावेळी तो हसायचा आणि जेव्हा मी गाडी दूर न्यायचो त्यावेळी तो रडायचा. असं करत करत तो सीन शूट केला. तसंच रिंकूच्या शेजारणीचा रोल मी त्याच्या आईलाच दिला. त्यामुळे शेवटी तो त्याच्या आईकडे रडत जात होता होता.'
त्यामुळे या एका सीनसाठी नागराज मंजुळेंना बऱ्याच क्लुप्त्या लढवाव्या लागल्या होत्या.
व्हिडिओ: 'असा शूट झाला शेवटचा सीन'