बंगळुरु : आयटी हब बंगळुरुमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही मुलींचा विनयभंग झाला. त्यानंतर एका तरुणीची भर रस्त्यात छेडछाड झाली. या प्रकारांमुळे देशाची मान शरमेने झुकली आहे. बॉलिवूडनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तर आमीर खाननेही या प्रकारावर नाराजी व्यक्ती केली आहे. आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन संबंधित प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. "या घटनेबाबत कळताच माझं रक्त खवळलं. आज माणूस असल्याची लाज वाटतेय," असं अक्षय कुमार म्हणाला.


अक्षय कुमार म्हणाला की, "आज मला माणूस असल्याची लाज वाटतेय. कुटुंबासोबत छोटी सुट्टी एन्जॉय करुन केपटाऊनहून परतलोय. तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या मुलीला कुशीत घेऊन एअरपोर्टवरुन बाहेरच पडत होतो, तोपर्यंत टीव्हीवरील एका बातमीवर नजर गेली. बंगळुरुमध्ये नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये नंगा नाच पाहिला, भर रस्त्यात... ते पाहून तुम्हाला कसं वाटलं हे माहित नाही, पण माझं रक्त खवळलं. एका मुलीचा बाप आहे. जरी नसतो तरी हेच बोललो असतो की, जो समाज आपल्या महिलांना आदर देऊ शकत नाही त्याला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार नाही."

मुलींचे कपडे आणि रात्री बाहेर फिरणं हे छेडछाडीसारख्या घटनेसाठी जबाबदार असल्याचं म्हणणाऱ्यांवर अक्षयने निशाणा साधला आहे. अक्षय कुमार म्हणाला की, "सर्वाधिक शरमेची बाब म्हणजे काही जण रस्त्यावर चालणाऱ्या मुलीसोबत झालेल्या छेडछाडीचंही समर्थन करण्याची औकात ठेवतात. मुलीने तोकडे कपडे का घातले? मुलगी घराबाहेर का पडली? अरे लाज बाळगा...मुलीचे कपडे छोटे नाही, तुमचे विचार आहेत. देव ना करो, जे बंगळुरुमध्ये झालं ते कधी तुमच्या मुलीसोबत किंवा बहिणीसोबत होवो. हे लोक इतर कुठून आलेले नाहीत. ते नराधम आपल्यामध्येच आहेत. ज्या दिवशी या देशाची मुलगी पलटवार करेल ना, त्यावेळी तुमची अक्कल ठिकाणावर येईल."

याशिवाय अक्षय कुमारने मुलींना मार्शल आर्ट शिकण्याचा सल्ला दिला आहे. अक्षय म्हणतो की, "तुम्ही स्वत:ला दुबळं समजू नका. तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही पूर्णत: सक्षम बनू शकता. मार्शल आर्टमध्ये एक लहान आणि सोपी टेक्निक आहे, ज्यामुळे तुमची सुरक्षा होऊ शकते. तुमच्या मर्जीविरोधात तुम्हाला हात लावण्याची हिम्मत कोणाच्याही बापामध्ये नाही. तुम्ही घाबरु नका, तुम्ही कोणापेक्षाही मागे नाही. अलर्ट राहा, स्वरक्षण शिका, पुढील वेळेला जर कोणीही तुम्हाला कपड्यांवर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला स्पष्ट सांगा की, तुझा सल्ला तुझ्याकडेच ठेव, थँक्यू, जयहिंद!"

पाहा व्हिडीओ