मुंबई : भारताची गानकोकिळा अर्थात ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी त्यांच्या चाहत्यांना ऑनलाईन दर्शन दिलं. ट्विटरच्या माध्यमातून फॉलोवर्सशी अनेकदा संवाद साधणाऱ्या लतादीदींनी फेसबुक लाईव्हवरुन गप्पा मारल्या.

2017 मध्ये चित्रपट सृष्टीत पदार्पण करुन लता मंगेशकर यांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे निमित्त आणि नवीन वर्षाचा योग साधत लतादीदींनी सांगीतिक कारकीर्दीतल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. काही जणांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर काहींना लतादीदींनी आशीर्वादही दिले.

मदन मोहन, यश चोप्रा यांचे किस्सेही लता मंगेशकरांनी सांगितले. वीर झारा चित्रपटासाठी अनेक वर्षांनी पार्श्वगायन केलं. यश चोप्रांचा आग्रह होता की चित्रपटातील सर्वच्या सर्व 11 गाण्यांना आपला आवाज लाभावा, त्यामुळे आपण तो पूर्ण केल्याचं लतादीदींनी सांगितलं.

सिंगापूर, कॅनडा, कोलकाता, इंदूर, लंडन अशा अनेक ठिकाणच्या आठवणी सांगण्यास चाहत्यांनी विचारलं. त्यावेळी भारताइतकंच लंडन चांगलं असल्याचं त्या म्हणाल्या. लंडनवासी प्रेमळ असल्याने आपण तिथे वर्षातून दोनदा जात असल्याचं लता मंगेशकरांनी सांगितलं.