तिरुअनंतपुरम : तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध व्हायोलिनवादक, संगीतकार आणि गायक बालाभास्कर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. लेकीच्या मृत्यूनंतर आठवड्याभराने त्यांनीही जगाचा निरोप घेतला. बालाभास्कर 40 वर्षांचे होते. केरळमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात बालाभास्कर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता.


केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये बालाभास्कर यांची गाडी झाडावर आदळली होती. चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे.

अपघातात बालाभास्कर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले होते. बालाभास्कर यांच्या मेंदू आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीवर उपचार सुरु आहेत. त्यांचा ड्रायव्हर अर्जुनही अपघातात जखमी आहे. तेजस्विनीचा अपघाताच्या दिवशीच मृत्यू झाला होता.

बालाभास्कर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्टेज शो करायला सुरुवात केली होती. दक्षिण भारताला फ्यूजन संगीताची ओळख करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. 17 व्या वर्षी त्यांनी मल्ल्याळम चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली.

बालाभास्कर आणि लक्ष्मी यांचा विवाह 2000 साली झाला होता. लग्नाच्या 16 वर्षांनी तेजस्विनीचा जन्म झाला, मात्र दुर्दैवाने ती अल्पायुषी ठरली.