तिरुवनंतपुरम : मल्ल्याळम संगीतकार आणि व्हायोलिनवादक बालाभास्कर यांच आज निधन झालं आहे. मागील आठवड्यात त्यांच्या गाडी अपघात झाला होता, यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात बालाभास्कर यांची दोन वर्षांची मुलगी तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातामुळे बालाभास्कर यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. 25 सप्टेंबरला बालाभास्कर त्यांच्या कुटुंबासोबत थिसुरहून देवदर्शनानंतर परतत असताना ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.
अपघातात बालाभास्कर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले होते. तर त्यांची दोन वर्षांची मुलगी तेजस्विनीला प्राण गमवावे लागले होते. त्यांचा ड्रायव्हर अर्जुनही अपघातात जखमी आहे.
बालाभास्कर यांची पत्नी आणि ड्रायव्हर अर्जुन यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर नशेत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्यामुळेच हा अपघात झाल्याचं समोर येत आहे.
बालाभास्कर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्टेज शो करायला सुरुवात केली होती. दक्षिण भारताला फ्यूजन संगीताची ओळख करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. 17 व्या वर्षी त्यांनी मल्ल्याळम चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली.
बालाभास्कर आणि लक्ष्मी यांचा विवाह 2000 साली झाला होता. लग्नाच्या 16 वर्षांनी तेजस्विनीचा जन्म झाला, मात्र दुर्दैवाने ती अल्पायुषी ठरली.