मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं रविवारी (31 मे) रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. त्यानंतर साजिद-वाजिद यांची आई रजीना खान यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कुटुंबातील व्यक्तींनी मंगळवारी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, 'रजीना खान यांना चेंबुर येथील सुराणा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.' दिवंगत संगीतकार वाजिद खानही याच रुग्णालयात उपचार घेत होते.


कुटुंबातील एका व्यक्तीने बोलताना सांगितले की, 'संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.' 42 वर्षीय वाजिद खान यांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोना व्हायरस आणि हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांनी मुंबईच्या चेंबूरमधील सुराणा सेठीया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


साजिद-वाजिद यांची आई कोरोना पॉझिटिव्ह


असं सांगण्यात येत आहे की, बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांची आई रजीना खान यांना आपला मुलगा वाजिद खानच्या आधीच कोरोनाचा संसर्ग झाला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजीना खान यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. असं सांगण्यात येत आहे की, आजारी वाजिद खान यांच्या देखभालीसाठी त्यांची आई रुग्णालयात थांबली होती. त्यावेळी इतर कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली.


दरम्यान, साजिद-वाजिद या जोडीने लॉकडाऊनमध्येच काही गाणी कंपोज केली होती. यामध्ये सलमान खानचं गाणं 'प्यार करोना'चाही समावेश होता. एप्रिलमध्ये रिलीज करण्यात आलेलं हे गाणं सलमान खानने गायलं होतं. साजिद-वाजिद यांचं सलमान खानसोबत एक खास नातं होतं. सलमान खाननेच त्यांना 1998मध्ये बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. 1998 मधील सलमान-काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाद्वारे साजिद-वाजिद यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर वाजिद यांनी
साजिदच्या साथीने सलमान खानच्या तेरे नाम, मुझसे शादी करोगी, पार्टनर, हेलो, गॉड तुस्सी ग्रेट हो, वॉण्डेड, वीर, दबंग, एक था टायगर, नो प्रॉब्लम या सांरख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं.


साजिद-वाजिद यांनी क्या यही प्यार है, किलर, शादी करके फंस गया यार, चोरी-चोरी, कल किसने देखा, तुमको न भूल पाएंगे, जाने क्या होगा, कल किसने देखा इत्यादी चित्रपटांनाही संगीत दिलं. याशिवाय सारेगामापा या म्युझिकल कार्यक्रमाशीही ते अनेक वर्ष जोडले होते.


संबंधित बातम्या : 


प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं मुंबईत निधन


रेल्वे स्टेशनवर मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकल्याच्या मदतीसाठी शाहरुख खान सरसावला


नवाजुद्दीनच्या धाकट्या भावावर पुतणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप