मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं रविवारी (31 मे) रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईच्या चेंबूरमधील सुरराणा सेठीया रुग्णालयात 43 वर्षीय वाजिद यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे मागील अडीच-तीन महिन्यांपासून रुग्णालयातच होते. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून वाजिद व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती.


किडनी आणि घशाच्या इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या वाजिद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचंही चर्चा होती. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. वाजिद खान यांना मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.


वाजिद खान यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती किंवा रुग्णालयाने त्यांच्या मृत्यू संदर्भात कोणतंही अधिकृत पत्रक जारी केलेलं नाही. त्यामुळे वाजिद खान यांच्या मृत्यूसंदर्भात कोविड-19, किडनीच्या इन्फेक्शनपासून हृदयविकाराचा झटका अशी वेगवेगळ्या कारणांची अटकळ बांधली जात आहे.


वाजिद खान यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देत संगीतकार सलीम मर्चंट यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, "होय, हे खरं आहे की वाजिद आता आपल्यात राहिले नाहीत." परंतु सलीम यांनी कोविड-19 मुळे वाजिद यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त फेटाळत सलीम मर्चंट यांनी म्हटलं की, "जवळपास सहा महिन्यांपूर्वी वाजिद यांना किडनीचा त्रास झाला होता आणि मग त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांची रोगप्रतिकार शक्ती फारच कमी झाली होती. वाजिद यांच्या घशातही इन्फेक्शन झालं होतं, ज्यामुळे त्यांना घशात फार त्रास होत होताा. वाजिद यांच्या निकटवर्तींयांकडून समजलं की त्यांच्या मृत्यूचं कारण हे किडनीशी संबंधित अडचणी होत्या."


1998 मधील सलमान-काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाद्वारे साजिद-वाजिद यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर वाजिद यांनी साजिदच्या साथीने सलमान खानच्या तेरे नाम, मुझसे शादी करोगी, पार्टनर, हेलो, गॉड तुस्सी ग्रेट हो, वॉण्डेड, वीर, दबंग, एक था टायगर, नो प्रॉब्लम या सांरख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं.


साजिद-वाजिद यांनी क्या यही प्यार है, किलर, शादी करके फंस गया यार, चोरी-चोरी, कल किसने देखा, तुमको न भूल पाएंगे, जाने क्या होगा, कल किसने देखा इत्यादी चित्रपटांनाही संगीत दिलं. याशिवाय सारेगामापा या म्युझिकल कार्यक्रमाशीही ते अनेक वर्ष जोडले होते.