मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या धाकट्या भावावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. मियाजुद्दीन सिद्दीकीवर दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या 22 वर्षीय पुतणीनेच हा आरोप केला आहे. यासंदर्भात त्याच्याविरोधात दिल्लीच्या जामिया नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसंच नवाजुद्दीन सिद्दीकीनेही कधीच या मुद्द्यावर माझी साथ दिली नाही, असंही तिने सांगितलं.
या गुन्ह्यासंदर्भात एबीपी न्यूजने त्याच्या पुतणीशी संपर्क केला असता तिने सविस्तरपणे यावर भाष्य केलं. ती म्हणाली की, "माझ्या काकाने माझ्यासोबत गैरवर्तन केलं आणि माझ्यावर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली त्यावेळी माझं वय नऊ वर्ष होतं. तो कायम मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे. सुरुवातीला मला काहीच समजलं नाही. मला हे फारच विचित्र वाटत होतं. माझ्या वडिलांनी आणि आजीनेही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. कुटुंबातील कोणीच माझं ऐकून घेत नसत. वाईट वर्तणूक आणि मारहाणीमुळे माझी आई मला आणि वडिलांना सोडून गेली. यादरम्यान सगळ्यांनीच माझे हाल केले. वडिलांनी माझी काळजी कधीच घेतली नाही आणि लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर कधी माझी साथ दिली नाही."
"वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत काकाने माझ्याशी गैरवर्तन आणि लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील बुढाणा पासून, माझ्या आत्याचं देहरादूनमधील घर आणि दिल्लीतील घरातही काकाने मला अनेक वेळा स्पर्श करण्याचा आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सप्टेंबर 2017 मध्ये काकाने हद्द पार करत माझ्यावर जबरदस्ती केली. मला मारहाण देखील केली. त्यावेळी माझ्या पोटाला दुखापत झाली होती. ज्याचे फोटो आजही माझ्याकडे पुरावे म्हणून आहेत. त्यावेळी मी 18 वर्षांची होते," असं तिने सांगितलं.
याबाबत बडे पापा म्हणजेच नवाजुद्दीन सिद्दीकाला धाकट्या काकाच्या हरकतींबाबत सांगण्याचा प्रयत्न कधी केला नाही का? असं विचारलं असता ती म्हणाली की, "2017 च्या आधीही धाकट्या काकाच्या वर्तणुकीबाबत मी बडे पापा (नवाजुद्दीन) यांच्यासोबत बोलले होते. काकांच्या या वागणुकीची मला भीती वाटते. कुठेही गेले तरी माझ्या मनात असुरक्षिततेची भावना असते, असं मी त्यांना सांगितलं होतं. पण माझं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मलाच असा विचार न करण्यास सांगितलं. ते तुझे काका आहेत, त्यांच्याबाबत असं बोलायचं नसतं. ते तुझ्यासोबत असं काही करु शकत नाहीत."
"माझं आणि बडे पापा (नवाज) मधील नातं कायमच चांगल होतं. माझा त्यांच्यावर विश्वास होता. मी अनेक गोष्टी त्यांच्याशी शेअर करायचेय. पण त्यांनी माझ्या या गोष्टीवर कधीच विश्वास का ठेवला नाही, याची मला कल्पना नाही. उलट त्यांनी मला शांत राहण्याचाच सल्ला दिला, असा दावा पुतणीने केला आहे.
ती पुढे म्हणाली की, "माझ्या आई-वडिलांचा प्रेमविवाह झाला होता. परंतु आईला घरात कधीच आदर-सन्मान मिळाला नाही. उलट प्रत्येक गोष्टीवर सगळ्यांचे टोमणे, अनादर आणि मारहाण होत असे. त्यामुळे ती घर सोडून गेली. त्यावेळी मी फक्त दोन वर्षांची होती. मग वडिलांनी दुसरं लग्न केलं. पुन्हा बाळ झाल्यानंतर वडिलांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या मनात एकटेपणाची भावना निर्माण झाली होती. काकाने 2017 मध्ये माझ्यावर केलेल्या जबरदस्तीचा प्रयत्न आणि मारहाणीच्या घटनेबाब नवाजुद्दीन यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की 'तुझी आई देखील खोटारडी होती आणि तू पण खोटारडी आहे. आम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा?"
तक्रारदार तरुणीने प्रेमविवाह केला आहे. त्यावेळी ती वडिलांसोबत दिल्लीत होती. या बाबतीत पतीचा संपूर्ण पाठिंबा मिळाल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली की, "दोन वर्षांपूर्वी मी प्रेमविवाह केला होता, तेव्हा कुटुंबीयांना ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी माझ्या पतीविरोधात माझं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला. आजही माझं कुटुंब माझ्या सासरच्यांना त्रास देतं. बडे पापा (नवाज) यांनी ठरवलं असतं तर या मुद्द्यात हस्तक्षेप करुन ते सोडवलं असतं. परंतु त्यांनी कधीच माझी मदत केली नाही."
पुतणीने केलेल्या आरोपांबाबत एबीपी न्यूजने नवाजुद्दीन सिद्दीकीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क केला असता बातमी लिहीपर्यंत त्याच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही. याबाबत एबीपी न्यूजने नवाजची पत्नी आलिया सिद्दीकीला प्रतिक्रिया विचारली असता, यासंदर्भात नंतर प्रतिक्रिया देईन, असं ती म्हणाली.