Aditya Sarpotdar Riteish Deshmukh : एका बाजूला बिग बजेट चित्रपटांना अपयशाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यास 'मुंज्या' (Munjya Movie) चित्रपट यशस्वी ठरला आहे. बॉलिवूडमध्ये आपला यशाची छाप सोडणारा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) आता दुसरा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि सोनाक्षी सिन्हाची (Sonakshi Sinha) प्रमुख भूमिका आहे. रितेशसोबत आदित्यचा हा दुसरा चित्रपट आहे.
हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्या याला प्रेक्षकांच्या चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मोठे सेलिब्रिटी नसतानादेखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा दमदार अभिनय, चित्रपटाची दमदार कथा यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाला पसंती मिळत आहे. तीन दिवसात चित्रपटाने 20 कोटींची कमाई केली आहे. मुंज्याच्या यशानंतर आता आदित्य सरपोतदारचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रितेश देशमुख-सोनाक्षीची मुख्य भूमिका
एका वृत्तानुसार, आदित्य सरपोतदार आणि रितेश देशमुख हे 'ककुडा' या चित्रपटातून पुन्हा एकत्र दिसणार आहे. भारतीय लोककथेवर हा चित्रपटाची कथा आधारीत आहे. ककुडादेखील हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवालांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन चिराग गर्ग आणि अविनाश द्विवेदी यांनी केले आहे.
वृत्तानुसार, 'ककुडा' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आदित्य सरपोतदारने याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. ओटीटी अथवा थिएटरमध्येही हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. येत्या 2-3 महिन्यात या चित्रपट रिलीज होईल असे आदित्यने सांगितले असल्याचे वृत्त मिड-डे ने दिले आहे.
आदित्य आणि रितेशचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी माऊली या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. रितेशची मु्ख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्यने केले होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आदित्य सरपोतदारने मराठीत दिग्दर्शित केलेले चित्रपट चांगलेच यशस्वी ठरले. 'नारबाची वाडी', 'उलाढाल', 'झोंबिवली', 'सतरंगी रे', 'माऊली' आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.