मुंबईतील पहिलं जुळं चित्रपटगृह 'गंगा-जमुना'वर हातोडा पडणार
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2019 10:13 AM (IST)
मुंबईतील गंगा जमुना चित्रपटगृहाची इमारत पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक ठरवली आहे. ही इमारत तात्काळ पाडून टाकण्यासाठी नोटीसही धाडण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतील पहिलं वहिलं जुळं थिएटर म्हणून ख्याती असलेलं ताडदेवमधील 'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या संरचनात्मक सर्वेक्षणात ही वास्तू अतिधोकादायक असल्याचं आढळलं आहे. गंगा जमुना चित्रपटगृहाची इमारत पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक ठरवली आहे. ही इमारत तात्काळ पाडून टाकण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत नोटीसही धाडण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हे चित्रपटगृह बंद अवस्थेत असलं तरी ताडदेव सर्कल परिसराची ओळख 'गंगा-जमुना' अशीच आजही आहे. मुंबईत आजही अनेक ठिकाणी जुळी किंवा तिळी चित्रपटगृहं आहेत. त्यांची सुरुवात गंगा जमुनामुळे झाली होती. त्याकाळात वातानुकूलित असलेल्या या चित्रपटगृहाची सुरुवात 'हरे रामा हरे कृष्णा' या सुप्रसिद्ध चित्रपटापासून झाली. त्यानंतर सुहाग, मिस्टर नटवरलाल, कालिचरण हे चित्रपट खूप गाजले. गंगा जमुनामध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सवी आठवडे अनुभवले, काही चित्रपट तर 50 आठवड्यांहून अधिक काळ गाजले. 'जान हाजीर है' हा चित्रपट तब्बल 75 आठवडे जमुनामध्ये चालला होता. सत्तरच्या दशकात मुंबईत मोठ्या चित्रपटगृहांच्या यादीत गंगा जमुनाचा समावेश होता. 2008 साली या चित्रपटगृहाची पुनर्बांधणी करण्यात येणार होती. त्यासाठी जो आराखडा तयार करण्यात आला होता, त्याला पालिकेने मंजुरीही दिली होती. मात्र त्याचं पुढे काहीच न झाल्यामुळे ही वास्तू गेली पंधरा वर्षे नुसतीच उभी आहे.