मुंबई : लोकसभेच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देशभरात सर्वत्र एक्झिट पोल्सचीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरदेखील याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यादरम्यान अनेक मिम्स सोशल मीडियावर फिरु लागले. बॉलिवूड अभिनेता आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या गोटात असलेल्या विवेक ओबेरॉयनेदेखील एक्झिट पोल्सबाबत एक मिम ट्विटरवर शेअर केले. परंतु या मिमच्या माध्यमातून विवेकने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा अपमान केला. त्यामुळे सर्व स्तरातून विवेकवर टीकेचा भडीमार होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील विवेकचा चांगलाच समाचार घेत ट्विटरवर त्याला उत्तर दिलं.

सर्वांनी टीका केल्यानंतरही विवेक ओबेरॉयला त्याचे काहीही वाटले नाही. उलट त्याने माध्यमांसमोर येऊन स्वतःच्या ट्वीटचे समर्थन केले. शिवाय त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उलट सुनावलं आहे. विवेकने प्रामुख्याने सोनम कपूरला लक्ष्य केले आहे.

विवेक म्हणाला की, काही लोक कूल बनण्यासाठी सोशल मीडियावर काहिही लिहितात. मला सोनम कपूरला विचारायचे आहे की, तिने आतापर्यंत महिला सशक्तीकरणासाठी काही काम केले आहे का? मी गेल्या 10 वर्षांपासून महिला सशक्तीकरणासाठी विविध कामे करत आहे. मी जेव्हा ही कामे करत होतो, तेव्हा सोनम कपूर तिच्या मेकओव्हरवर काम करत होती. मी सोनम कपूरला सल्ला देऊ इच्छितो की, तिने तिच्या चित्रपटांमध्ये ओव्हर अॅक्टिंग कमी करावी, तसेच आणि सोशल मीडियावर ओव्हर रिअॅक्ट करणे कमी करावे.

काय होतं विवेकचं ट्वीट?
एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदींची पुन्हा लाट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप समर्थकांनी काँग्रेसची खिल्ली उडवणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यातच विवेक ओबेरॉयनेदेखील एक मिम ट्विटरवर शेअर केले. त्यामध्ये त्याने एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल यामधील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल यामधील फरक स्पष्ट करण्यासाठी विवेक ओबेरॉयने सलमान खान, ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या लव्ह स्टोरींचा वापर केला आहे. उदाहरण म्हणून त्याने म्हटले की, सलमान खान आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी ही ओपिनियन पोलप्रमाणे आहे. तर विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी ही एक्झिट पोलसारखी आहे. परंतु ऐश्वर्याचं सलमान खान आणि विवेक या दोघांपैकी कोणाशीही लग्न झालं नाही, ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं हे सत्य आहे. त्यामुळेच ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न म्हणजे निवडणुकीच्या निकालाप्रमाणे आहे.

विवेकच्या या ट्वीटनंतर त्याच्यावर लोकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने महिलांनी विवेकला हीन प्रवृत्तीचा असल्याचे म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील विवेकच्या या ट्वीटचा चांगलाच समाचार घेतला आहे. सोनमने त्याला Disgusting and classless म्हटले आहे.

पाहा काय म्हणतोय विवेक


दरम्यान विवेक ओबेरॉयने केलेल्या ट्वीटची राज्य महिला आयोगानेदेखील दखल घेतली असून त्याला नोटीस बजावली जाईल, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.

विवेक ओबेरॉयचं व्हायरल होणारं ट्वीट


सोनम कपूरचं ट्वीट