मुंबईच्या वरळी पोलिस वसाहतीत हा प्रकार पाहायला मिळाला. नागराज मंजुळेसह रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख वरळीत आले होते. सैराटमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावणारे राम पवार हे नागराजचे मित्र. ते स्वत: पोलीस आहेत. त्यांनीच या टीमला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे नागराजसह सगळे जण रात्री 9.30 च्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचले.
चाहत्यांचा मध्यरात्री झिंगाट
सैराटची टीम आल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी झाली. सुरुवातीला 30 ते 40 जणांचा ग्रुप जमा झाला. त्यानंतर हळूहळू त्यांची संख्या वाढली. रात्र 12 पर्यंत शेकडो चाहते तिथे गोळा झाले होते. मात्र एवढ्या रात्रीही त्यांच्या उत्साह मावळला नव्हता. चाहते आर्ची आणि परशाच्या नावाने ओरडत होते. झिंगाट, सैराट झालं जी, याड लागलं ही गाणी लावून अक्षरश: धम्माल करत होते. मोठ्या संख्येने चाहते गोळा झाल्याने सैराटच्या टीमला घराबाहेर पडणं शक्य होत नव्हतं. अखेर गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं.
'सैराट' टीमसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त
प्रचंड पोलिस बंदोबस्तात रिंकू, आकाशसह सगळ्यांना बिल्डिंगमधून खाली आणण्यात आलं. मात्र आकाश, रिंकू, नागराज दिसताचा त्यांचा फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्यांना आवारणं पोलिसांना कठीण जात होतं. पोलिसांनी आकाश, रिंकू, अरबाज, तानाजी आणि नागराज यांना चाहत्यांच्या तावडीतून सुखरुप बाहेर काढलं आणि त्यांना अक्षरश: गाडीत कोंबलं.
खरंतर रिंकू आणि आकाशसाठी सध्या चाहत्यांची गर्दी नवी नाही. मात्र एवढया रात्रीही चाहते त्यांना पाहण्यासाठी आल्याचं पाहून तेदेखील गोंधळले होते.
संबंधित बातम्या