Double Decker Bus: मुंबईची (Mumbai) ओळख समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या जुन्या डबल डेकर (Double Decker) बस सेवेतून निवृत्त झाल्या. बेस्टच्या जुन्या डबल डेकर बसेसची सेवा 15 सप्टेंबरपासून बंद करण्यात आली.  अनेक मुंबईकरांनी मुंबईमध्ये डबल डेकरने प्रवास केला आहे.  डबल डेकर ही मुंबईकरांसाठी जशी स्पेशल होती तसेच ही बस बॉलिवूडसाठी देखील खास होती. बॉलिवूड आणि डबल डेकर बसचे खास कनेक्शन होते. याबाबत जाणून घेऊयात...


डबल डेकर बस आणि बॉलिवूड


डबल डेकर बसचे आणि बॉलिवूडचे खास कनेक्शन आहे. अनेक  बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुंबई बेस्टची डबल डेकर बस दाखवण्यात आली आहे.1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या शान या चित्रपटामधील जानू मेरी जान या गाण्यामध्ये डबल डेकर बस दाखवण्यात आली आहे. तसेच  1994 मध्ये रिलीज झालेल्या  मोहरा या चित्रपटामधील अक्षय कुमार ( Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांच्या आयकॉनिक सीनचं शूटिंग देखील डबल डेकर बसमध्ये करण्यात आलं आहे.


 तारे जमीन पर,ओके जानू या चित्रपटांमध्ये देखील  डबल डेकर बस दाखवण्यात आली. या चित्रपटांमधील सीन्समध्ये कलाकार हे डबल डेकर बसमधून मुंबईमध्ये प्रवास करताना दिसले.  


चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं, 'मुंबई बेस्टची डबल डेकर बस बंद झाल्याची बातमी समजताच चित्रपटांतील याच बेस्ट डबल डेकर बसची अनेक दृश्ये आठवली.  विजय आनंद आणि जया बच्चन यांच्यावर चित्रित झालेला 'कोरा कागज ' या चित्रपटातील एक सीन आठवला. हा चित्रपट अनिल गांगुली यांनी दिग्दर्शित केला.हिरालाल पन्नालाल, अर्जुन, कर्मयोगी, चक्रव्यूह, बाॅम्बे, गजनी, शान , नास्तिक, छोटीसी बात अशा अनेक चित्रपटांत बेस्ट डबल डेकर बस होती. '


डबल डेकर बसचा इतिहास


सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ 3 डबल डेकर ओपन डेक बस आणि 7 साध्या डबल डेकर बस उरल्या होत्या. मुंबईत 1937 मध्ये डबल डेकर बसची सुरुवात झाली, 86 वर्ष या बसने प्रवाशांना सुखकर प्रवासाचा आनंद दिला. 86 वर्षांपासून ही बस मुंबईच्या रस्त्यांवरुन धावत होती. आता मात्र ही बस आता मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही.  फेब्रुवारीतच बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस आल्या. त्यामुळे मुंबई दर्शन आता एसीच्या गारव्यासोबत सुखद होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Mumbai: 86 वर्षांपूर्वी सुरू झालेली डबल डेकर बस इतिहासात जमा; मुंबईकर भावुक, पाहा फोटो