अंजलीची आई सोमवारी रात्री उत्तर प्रदेशहून मुंबईत दाखल झाली. त्यावेळी तिने डी. एन. नगर पोलिसांकडे अंजलीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. फोनवर शेवटचं बोलणं झालं, त्यावेळी ती खुश तर होतीच, पण पुढच्या महिन्यात होणारं नातेवाईकाचं लग्न आणि वाढदिवसाच्या तयारीला लागली होती. त्यामुळे 24 तासांत ती आत्महत्या कशी करेल, असा प्रश्न तिच्या आईनं उपस्थित केला.
" उसके साथ जीने का एक मौका दे दे ऐ खुदा
तेरे साथ तो हम मरने के बाद भी रह लेंगे | "
8 जूनला फेसबुकवर लिहिलेली अंजलीची ही शेवटची पोस्ट. यातच अंजलीच्या मृत्यूचं गूढ पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
अंजलीच्या आई शीना श्रीवास्तव यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न
1. अंजलीचा मृतदेह ज्या खोलीत आढळला, त्या दरवाजाची कडी आतून बंद नव्हती
2. अंजलीने पंख्याला गळफास लावला असेल, तर पंखा आणि बेडमधील अंतर पाहता तिचे पाय बेडला लागण्याची शक्यता आहे
3. अंजलीच्या खोलीतून सुसाईड नोट मिळालेली नाही, किंवा तिने आत्महत्या केल्याचा ठोस पुरावा नाही.
महिन्याभरापूर्वी शीना या अंजलीसोबतच मुंबईत राहत होत्या. त्या काळात अंजलीला डिप्रेशनही आलं नव्हतं, किंवा तिला आर्थिक चणचणही नव्हती. तिच्या प्रियकरासोबतच्या नात्यात ताणतणाव असल्याचंही तिने कधी आपल्याला सांगितलं नसल्याचा दावा, शीना यांनी केला आहे.
मुंबईत 29 वर्षीय अभिनेत्री अंजली श्रीवास्तवचा गळफास
अंजलीचे नातेवाईक तिला वारंवार फोन करत होते, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी घरमालकाशी फोनवरुन संपर्क साधला. घरमालकाने डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला असता अंजली साडीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
घरमालकाने तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. अंजली अंधेरीतील जुहू परिसरातल्या परिमल सोसायटीत राहत होती.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अहवाल आहे. पोलिस सध्या अंजलीचे मित्र-मैत्रिणी आणि फोन रेकॉर्ड तपासून प्रेम प्रकरणाबाबत तपास करत आहेत.