भ्रष्टांपुढे जॉली झुकणार नाही, 'जॉली एलएलबी 2'चा दुसरा ट्रेलर
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2017 04:10 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारच्या बहुप्रतीक्षित 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. कॉमेडी, अॅक्शन आणि इमोशन यांचा मिलाफ असलेल्या 'जॉली एलएलबी 2'मध्ये अक्षय जॉली या वकिलाच्या भूमिकेत आहे, तर अभिनेत्री हुमा कुरेशी त्याच्यासोबत झळकणार आहे. सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात केवळ 21 हजार वकील आणि साडेतीन कोटी पेंडिंग कोर्ट केसेस, असा ठोकताळा जॉली ट्रेलरच्या सुरुवातीला मांडतो. त्यानंतर या सिनेमाचा प्रवास दुसऱ्या ट्रेलरमधून उलगडताना दिसतो. #JollyLLb2NewTrailer हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. 'सत्याच्या बाजुने उभं राहणं सोपं नाही, मात्र जॉली भ्रष्ट माणसांपुढे झुकणार नाही' अशा कॅप्शनसह अक्षयने सिनेमाचा ट्रेलर ट्वीट केला आहे. 'सलमान खानचं लग्न कधी होईल हे सांगू शकतोस का?' यासारख्या हशा पिकवणाऱ्या डायलॉग्सपासून 'जर प्रेमात आणि युद्धात सारं माफ असेल, तर सीमेवर जवानांचे होणारे शिरच्छेदही कायदेशीर आहेत आणि प्रेमात तरुणींवर होणारे अॅसिडहल्लेही कायदेशीर आहेत' असे टाळ्या मिळवणारे डायलॉग्जही पहिल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले होते. ‘जॉली एलएलबी’ या 2013 मधील चित्रपटाचा हा सिक्वेल असून सुभाष कपूर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. येत्या 10 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. पाहा ट्रेलर :