नागपूर : प्रसिद्ध पंजाबी रॅप गायक यो यो हनी सिंगवर नागपुरात दाखल असलेला एफआयआर रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून दिलासा मिळवण्यासाठी गेलेल्या हनी सिंगला प्रत्यक्षात मात्र कोर्टाने दणका दिला आहे.


'लुंगी डान्स', 'पार्टी ऑल नाईट', किंवा 'चार बॉटल वोडका' यासारखी अनेक लोकप्रिय गाणी यो यो हनी सिंगने गायली आहेत. यातील अनेक गाणी ही युट्यूबवरही उपलब्ध आहेत. मात्र या गाण्यांमध्ये अश्लील शब्द असल्यामुळे ते जाहीर गाता किंवा ऐकता येत नसल्याची तक्रार नागपूरमधील व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी 2014 मध्ये केली होती.

या तक्रारीवरुन माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलमाअंतर्गत हनी सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हनी सिंगने या तक्रारीत फारसं तथ्य नसून आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करण्याची मागणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर केली होती. मात्र जस्टीस भूषण गवई व इंदिरा जैन यांनी हा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला आहे.

जब्बल यांनी ही तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सहा महिन्यापर्यंत काहीच कारवाई केली नव्हती. त्यानंतर जब्बल यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली, तरीही कारवाई झाली नव्हती. अखेर त्यांनी जेएमएफसी कोर्टाकडे धाव घेतली. पोलिसांनी कोर्टाला तपास सुरु असल्याचं सांगितल्यामुळे तिथेही जब्बल यांची तक्रार फेटाळण्यात आली.

अखेर आनंदपालसिंग जब्बल यांनी मुंबई हायकोर्ट गाठलं. हायकोर्टाच्या निर्देशानंतर हनी सिंग आणि इतरांविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.