मुंबई: तेलुगू चित्रपटसृष्टीत करिअरसाठी धडपडणारी अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवला. त्यांनतर आता मराठी चित्रपट सृष्टीतही मोठ्या तारकांना या प्रकाराला कधी ना कधी सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.


ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि मृण्मयी देशपांडे यांनीही आपल्याला कॉम्प्रमाईज करण्याच्या ऑफर आल्या. मात्र आपण त्या ऑफर धुडकावून लावल्याचं सांगितलं.

एबीपी माझाच्या माझा विशेष या कार्यक्रमात दोघींनीही याबाबत खुलासा केला.

याआधीही अभिनेत्री गिरीजा ओक हिनेही मराठी चित्रपटसृष्टीत असे प्रकार घडत असल्याची म्हटलं होतं.

दोनच दिवसांपूर्वी हैदराबादेत श्री रेड्डी या अभिनेत्रीने रोलच्या बदल्यात दिग्दर्शकाने आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याचा निषेध म्हणून सार्वजनिक ठिकाणी तिने आपले कपडे उतरवले होते.

अलका कुबल काय म्हणाल्या?

मी वयाच्या पंधराव्या वर्षी इंडस्ट्रीत आले. मलाही माझ्या तरुणपणात असे अनुभव आले. मलाही विचारण्यात आलं होतं, मॅडम तुम्ही कॉम्प्रमाईज करायला तयार आहात का? असाल तर तुम्हाला ही फिल्म मिळेल. ही त्या काळातली घटना आहे. आज मला फिल्म इंडस्ट्रीत येऊन जवळपास 35 वर्ष झाली आहेत.

मी अशा ऑफर धुडकावून लावल्या. मी ठामपणे नकार दिले. मला अशा पद्धतीने काम मिळवायचं नव्हतं. मला अशा माणसांसोबत कामच करायचं होतं.

पण मला इथे सर्वांना सांगायचं आहे की चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल, तर ते तुमच्यावर आहे. तुमच्यावर कोणी जबरदस्ती करत नाही. शॉर्टकटने कोणीही मोठं होतं नाही. शॉर्टकट वापरणाऱ्यांचा वापर केला जातो आणि त्यांना बाजूला केलं जातं.

संबंधित बातम्या
कास्टिंग काऊचविरुद्ध अभिनेत्रीचं भररस्त्यात टॉपलेस होऊन आंदोलन