मुंबई : काळवीट शिकार प्रकरणातील गुन्हेगार सलमान खानला शनिवारी जामीन मंजूर झाल्यानंतर रात्री उशिरा तो मुंबईत दाखल झाला. यावेळी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे सलमानला भेटण्यासाठी सेलिब्रिटींनीदेखील रिघ लावली होती.


सलमानला भेटण्यासाठी कतरिना कैफ, अरबाज खानची एक्स पत्नी मलायका अरोरा, बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा, डेझी शाह, महेश मांजरेकर आदींनी भेट घेतली. त्याशिवाय, सलमान घरी पोहोचल्यानंतर त्याने गॅलरीत येऊन चाहत्यांना झलक दिली. यावेळी सलमानसोबत वडील सलीम खान, आई, बहीण अर्पिता इत्यादी मंडळी होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.

यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.