हैदराबाद : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावाने ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’मध्ये विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराची घोषणा झाली आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री तमन्ना भाटिया पहिल्या ‘श्रीदेवी पुरस्कारा’ची मानकरी ठरली आहे.

येत्या रविवारी ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’ सोहळा रंगणार आहे. यावेळी तमन्नाचा गौरव केला जाईल.

“श्रीदेवी अशांपैकी एक आहेत, ज्या सिनेक्षेत्रात माझ्यासाठी प्रेरणादायी राहिल्या आहेत. सिनेक्षेत्रातील करिअरच्या सुरुवातीला त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली. त्यांच्याच नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने माझा गौरव होणं, माझं भाग्य समजते. मीही त्यांच्यासारखंच कमी वयात सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.”, अशा भावना अभिनेत्री तमन्ना भाटियाने व्यक्त केल्या.

श्रीदेवी यांच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाच्या रिमेकमध्ये तमन्ना भाटियाने मुख्य भूमिका साकारली होती. बाहुबलीसह अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका तमन्नाने साकारल्या आहेत. ‘कन्ने कलई माने’, ‘ना नवे’, ‘खामोशी’ आणि ‘क्वीन वन्स अगेन’ हे तमन्नाचे आगामी सिनेमे आहेत.

हिंदी सिनेमातील पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचा फेब्रुवारी महिन्यात दुबईतील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला.