मुंबई : बॉलिवूड अभिनेता इंदर कुमारचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला. मुंबईतील अंधेरीतल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला.
महेश कोठारेंच्या 'माझा छकुला'वर आधारित 'मासूम' या हिंदी चित्रपटातून इंदर कुमारने पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलमान खानसोबत तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड यासारख्या चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या. त्याने जवळपास 20 चित्रपटात काम केलं आहे. सध्या तो 'फटी पडी है यार' चित्रपटाचं शूटिंग करत होता.
एकता कपूरच्या गाजलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहु थी' या मालिकेत 20 वर्षांच्या लीपनंतर त्याने मिहीर विरानी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र काही महिन्यांतच त्याने मालिका सोडली.
गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. आज दुपारी यारी रोडमधील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
इंदर कुमारचे गाजलेले चित्रपट
तिरछी टोपीवाले
कही प्यार ना हो जाए
बागी
गजगामिनी
तुमको ना भूल पाएंगे
वाँटेड