'बेस्ट पिक्चर' हा ऑस्कर पटकवण्यासाठी धोनी आणि सरबजित हे दोन चित्रपट विविध देशातील चित्रपटांशी स्पर्धा करतील. जगभरातील 336 चित्रपटांची निवड आतापर्यंत झालेली आहे. नीरज पांडे दिग्दर्शित 'धोनी' चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, दिशा पटानी, कायरा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. सरबजित चित्रपटात रणदीप हुडा, ऐश्वर्या राय-बच्चन झळकले होते.
अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्करच्या अंतिम यादीत स्थान मिळवण्यासाठी संबंधित फीचर फिल्मचे खेळ लॉस अँजेलिसमधील व्यावसायिक थिएटरमध्ये एक जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत किमान सलग सात दिवस व्हायला हवेत. या चित्रपटाचा कालावधी किमान 40 मिनिटांचा असणं आवश्यक आहे.
भारतीय-अमेरिकन दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या 'क्वीन ऑफ कातवे' या चित्रपटाचा समावेशही या यादीत झाला आहे. याशिवाय 'ला ला लँड', 'मूनलाईट', 'मँचेस्टर बाय द सी', 'सायलेन्स', 'अरायव्हल', 'डेडपूल', 'सुसाईड स्क्वॅड', 'कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर', 'एक्स मेन : अॅपॉकॅलिप्स' यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचाही समावेश आहे.