मुंबई : हा इसम टीव्हीवर आला की टीव्ही पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर कमालीचं कुतूहल दाटतं. आता आपल्या समोर ठेवलेल्या टीव्हीवर आता पुढे काय होणार याची त्याला कमाल उत्सुकता लागून राहते. कारण, समोरच्या टीव्हीवर आलेला असतो एक अफलातून इसम. सुटाबुटात असलेला हा इसम असतो वयाने मोठा. पण याच्या करामती आणि त्याच्याकडे असलेला छोटा टेडी पाहता आपण जे पाहातो आहोत तितकं सोपं प्रकरण हे नाहीय याची खात्री पाहणाऱ्याला पटते आणि त्यानंतर हा सुटाबुटातला इसम तोंडातून एक चकार शब्द न काढता कमाल लवचिकतेनं जी काही धमाल उडवून देतो ती केवळ पाहून चकित करणारी असते.


याच इसमाचं नाव मिस्टर बीन. मिस्टर बीननं जगाला हसवलं. खरंतर मूक नाट्याचा फॉर्म घेऊन या मिस्टर बीननं अनेक करामती केल्या. ही व्यक्तिरेखा साकारणारा अवलिया कलाकार आहे, रोवन एटकिन्सन. आता रोवन जवळपास 65 वर्षांचे आहेत. आजही त्यांना मिस्टर बीन म्हणूनच ओळखलं जातं. पण आता हेच मिस्टर बीन आपल्या अवताराला कंटाळले आहेत. साक्षात रोवन यांनीच ही गोष्ट कबूल केली आहे.


सध्या रोवन हे एनिमेटेड मिस्टर बीनवर काम करतायत. वास्तविक बीन साकारण्यापेक्षा हा एनिमेटेड बीन साकारणं तुलनेनं त्यांना सोपं जातं आहे. यावेळी बोलताना रोवन यांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, आता मला मिस्टर बीन साकारताना तितकी मजा येत नाही. कारण, मिस्टर बीन साकारताना मी पुरता थकून जातो. दमून जातो. शिवाय, आजवर लोकांनी मिस्टर बीनवर अमाप प्रेम केलं आहे. त्याचं ओझं खूप आहे. मिस्टर बीन साकारताना हे ओझं मला सतत जाणवत असतं. त्यामुळे आता मिस्टर बीन या व्यक्तिरेखेला रामराम ठोकायचा माझा विचार आहे. आता हा अलविदा कसा करायचा.. याबद्ल अद्याप माझ्या मनात निश्चित असं काही ठरलेलं नाही. पण लवकर मला त्याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे.


मिस्टर बीन जगभरात तुफान लोकप्रिय झाला. 1990 ते 1995 या पाच वर्षात मिस्टर बीनचे वेगवेगळे एपिसोड्स आले. त्यानंतर रोवन एटकिन्सन लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले. मिस्टर बीन यांचं पुढे एनिमेशन आलं. कार्टून आलं. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिस्टर बीन लोकांचं रंजन करत होता. पण आता मात्र रोवन यांनाच बीनला अलविदा करायचा आहे. मिस्टर बीन मुळात वेंधळं कॅरेक्टर आहे. आपल्या उचापत्यांमुळे तो आपल्यासह आपल्यासोबतच्या इतरांनाही कसा अडचणीत आणतो त्याचे एपिसोड्स लोकप्रिय आहेत. रोवन यांनी आपल्या अभिनयाने ही व्यक्तिरेखा अजरामर केली आहे.