चि. व चि. सौ. कां. परेश मोकाशीचा हा प्रदर्शित होणारा तिसरा सिनेमा. पण परेशच्या सिनेमाचा असा स्वतःचा प्रेक्षकवर्ग त्याने निर्माण केला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरीमधले दादासाहेब फाळके अन् त्यांचं पॅशन त्याने नेमकेपणाने टिपलं, एलिझाबेथ एकादशीमध्ये त्याने ज्या प्रकारे मुलांचा स्ट्रगल टिपताना, त्यामधील निरागसता तितक्याच निगुतीने जपली, पण आपणच रचलेल्या समीकरणाने तुम्हाला धक्का दिला आहे. कारण आतापर्यंत वेगळ्या पायवाटेवरुन चालणाऱ्या परेशने इतरांसारखाच सिनेमा केला आहे. आता त्याने फॉर्म्युलेबाज सिनेमा करू नये का? अन् तसा त्याने करुन पाहिला तर बिघडलं कुठं? असे दोन्ही प्रवाद आहेत. पण त्याने स्वतः नेहमी करतो त्यापेक्षा वेगळा प्रयत्न केला म्हणून निश्चित कौतुक आहे, पण या दुष्टचक्रात तो अडकू नये, असं प्रामाणिकपणे वाटतं. आता हे दुष्टचक्र म्हणजे रुटिन फॉर्म्युलेबाज ठोकताळे बांधून केल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट्सच्या बाबतीत म्हणतो आहे.
ही सगळी पात्रं त्याने कॅरिकेचर सारखी उभी केली आहेत. त्याच्या जगण्याचा भाग आहे, त्यामुळे त्या गोष्टीला असलेला एक वास्तवदर्शीपणा आहे. लव्हस्टोरी प्रेडिक्टेबल असते, मात्र त्याने या सगळ्या खेळात समीकरण बदलता येत नसल्यामुळे पात्रांच्या व्यक्तिरेखांच्या वैचित्र्यपणाचा ढाचा रचलाय, अन् त्यामधून नावीन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो. मुळात या सगळ्यामध्ये मनोरंजन हा गाभा आहे.
दोन टोकाची माणसं एकत्र संसार करु शकतात का, ही गुण- सूत्र - पद्धत त्याने इथे आजमावून पाहिली आहेत. यामध्ये सत्यप्रकाश अन् सावी म्हणजे ललित प्रभाकर अन् मृण्मयी गोडबोले. मुळात दोन नवीन चेहरे या निमित्ताने आपल्यासमोर आले. ज्यांना खरंच व्यक्त होता येतं, अन् सिनेमाची परिभाषा कळते. सत्यप्रकाश हा सोलार एनर्जी... म्हणजे सौरऊर्जेशी निगडित काम करणारा, स्वच्छतेचा भोक्ता, गॅझेट्सवर जिवापाड प्रेम करणारा अन् पाणी वाया न घालवणारा असा... पाणी वाचवण्यासाठी तर तो चक्क एक शर्ट चार दिवस वापरणारा आहे. त्याची म्हणून अशी स्वतःची तत्त्व आहेत तर सावित्री ही वेगन आहे. म्हणजे पशु-पक्ष्यांपासून निर्माण केलं जाणारं कोणतंही उत्पादन न वापरणारी... भूतदया असणारी व्हेटर्नरी डॉक्टर... म्हणजे एमबीबीएसला अॅडमिशन मिळत असूनही तिने व्हेटर्नरी डॉक्टर होणं पसंत केलंय... अत्यंत टापटिप असणारी पण हातातून सतत मोबाईल पाडणारी गॅझेट्सबद्दल तितकीशी आत्मीयता नसलेली, आजच्या काळात सोशल नेटवर्किंगवर नसलेली अशी ही सावित्री.
हे दोघं एकमेकांना एका कोर्ट मॅरेज दरम्यान भेटतात... पण नंतर ते एकमेकांसमोर स्थळ म्हणून येतात. खरं तर दोघांनाही लग्न करायचं नसतं... पण त्यावेळी सावित्री म्हणते की, लग्नापूर्वी मुलासोबत काही काळ राहून बघायचंय अन् ते राहतात...अन् त्यामधून दोन्ही घरांना असणारा कल्चरल शॉक... त्यामध्ये आपल्याला सत्यप्रकाशची आजी भेटते. आजी म्हणजे ज्योती सुभाष. तिचं भूदरगडकरांसोबत अफेअर सुरू आहे... ही आजी सत्तरीच्या घरातली आहे. आजोबा जाऊन एव्हाना तब्बल वीस वर्ष उलटली आहेत, पण तरीही आजी मात्र पिकल्या पानाचा देठ हिरवा असलेल्या आहेत. दोघांच्या घरचे हे इरसाल नसते तरच नवल.
सत्यप्रकाश अन् सावित्रीच्या दोन महिन्यांच्या लग्न पूर्व काळातील नातेसंबंधात त्यांचे स्वभाव एकमेकांच्या विरोधातील असणारे आहेत. त्यामुळे हे समीकरण आपसूकच जुळेल असं कुणालाही वाटत नसतं... पण या नात्यांमध्ये कसे बदल होत जातात अन् त्या सगळ्या गोष्टींचे टप्पे कसे बदलत जातात... रुपक म्हणून मित्राची लव्हस्टोरी ते त्याचं विभक्त होणं वगैरे असं आहे, पण या सगळया गोष्टींमध्ये ज्या प्रकारे रंग भरले आहेत ते जरा गंमतशीर आहेत.
पात्र अन् त्यांची रचना... अन् त्यांच्यामधील तऱ्हेवाईकपणा या सगळया गोष्टींना दिलेली फोडणी यामुळे हे प्रकरण इंटरेस्टिंग करण्यासाठीची सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स तपासून पाहिली आहेत. एकापेक्षा एक इरसाल नमुने आहेत. त्यांची गाथा अधिक चमकदार करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण सत्यप्रकाश अन् सावित्री यांच्यामधील टोकाचं असणं अन् तत्त्वाला चिकटून राहण्यामधली आढ्यता अन् त्या सगळ्यामध्ये त्यांच्या घरचे स्ट्रेसबस्टर्स आहेत. डिव्हाईस म्हणून सूत्रधार वापरण्याची शक्कल वर्क होते.
मधुगंधा कुलकर्णीचे संवाद रंगत आणतात... अन् पटकथेमध्ये ज्या प्रकारे इंटरेस्टिग फॅक्टर्स पेरले आहेत. अन् त्या पात्ररचनेमधील गंमत आहे.
परेश मोकाशीच्या दिग्दर्शनातील वैविध्य म्हणून या सिनेमाकडे पाहता येईल. कारण त्याच्या तिन्ही सिनेमांमध्ये वेगळेपण आहे. यामधील पात्रांना त्याने ज्याप्रकारे सादर केलं आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात, त्यांच्या व्यक्त होण्यात रंगत आहे. या खेळात एकप्रकारचा चमकदारपणा त्याने टिकवून ठेवला आहे. सगळयात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखा ही काहीतरी गोष्ट करतेय अन् संवाद साधतेय... नाहीतर आपल्याकडे नुसतेच बोलपट असतात.
सत्यप्रकाश म्हणून आपल्यासमोर येणारा ललित प्रभाकरचं हे पदार्पण. त्याने पदार्पणात फुल ऑन बॅटिंग केली आहे. त्याची अन् मृण्मयीची केमिस्ट्री वा त्याची घरातल्यांसोबतचं नातं... या सगळ्या गोष्टींमध्ये व्यक्त होणारा ललितसमोर अख्खी नवी इनिंग पडली आहे. पण प्रॉमिसिंग आहे, याची जाणीव त्याने करून दिली आहे. मृण्मयीने डान्सिंग डाऊन द विकेट येऊन सिक्सर्स मारले आहेत. तिच्या सावित्रीमध्ये पुशिरेग्यांची सावित्री शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. आपल्याला लच्छीचा मोर आठवतो. मृण्मयीने साकारलेली डॉक्टर असेल वा मुलगी... तिच्या घरातील सीन्सही ती उत्तमपणे साकारते. तिच्यातील समज अन् व्यक्त होण्यातील स्वाभाविकता भावते.
ज्योती सुभाष यांनी साकारलेली आजी कमाल. प्रदीप जोशींनी साकारलेले त्रागा करणारे बाबा भलतेच भाव खाऊन जातात. सुप्रिया पाठारेने साकारलेली आई धमाल आणते. सुनील अभ्यंकरने साकारलेला मुलीचा त्रस्त बाप भाव खाऊन जातो. तर शर्मिष्ठा राऊत दखल घ्यायला भाग पाडते. पूर्णिमा भावेने साकारलेली सात्त्विक संताप व्यक्त करणारी आई लक्ष वेधून घेते.
सिनेमॅटोग्राफीबद्दल पहिल्यांदाच हा सुधीर पलसानेंचा कॅमेरा अभावाने वाटतो. त्यांच्या नजाकतभऱ्या सिनेमॅटोग्राफीची उणीव इथे भासते, इथे त्यांनीही आपली दृश्यचौकट बदलली आहे, असं वाटतं. संगीत हा विशेष भाग आहे. चक्क सिनेमात डॉक्टर म्हणून संगीतकाराने अभिनय पण केला आहे. अभिनयाचा ताल अन् लय नरेंद्र भिडेला इथे गवसलेली जाणवते. गाण्यामध्ये वा इतर सुरवटींमध्ये मनाला साद घालण्याची ताकद दिसते. नरेंद्र भिंडेच्या संगीतामधील ती मजा आहे. त्याला नकळत आपण दाद देतो.
मात्र या सगळ्यात एकूणच सुरूवातीपासून सारेच जण टिपेच्या सूरात का बोलतात... त्या सगळ्यामुळे एका पॉईंटनंतर डोकं ठणकायला लागतं. सतत ओरडून तारसप्तकात बोलणाऱ्या या नातेवाईकांचं काय करायचं... असं वाटतं. यामधील भांडणाचे सिक्वेन्स तर अजब आहेत. त्या भांडणाच्या सुरुवात, मध्य अन् शेवट यामध्ये तर एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये जो काही सूर लागलाय... तो तर अॅड्रेस टू चा कोणता भाग आहे, हेच कळत नाही... चक्क मृण्मयी रिक्षामध्ये बसताना रिक्षावाल्याला तुम्ही वेज आहात का, तरच मी रिक्षात बसेन वगैरे अतिशोयोक्तीचा भाग दिसतो. तर कचऱ्याच्या डब्यात न मावणारा कचरा स्वतःच्या सॅकमध्ये घेऊन तिथल्या बॉटलमधलं पाणी स्वतःच्या बॉटलमध्ये भरून घेणं जरा अतिच होतं. आताच्या लिव्ह इनच्या काळातही दोन महिने एकत्र राहून पाहायचंय... या गोष्टीचा इतका बाऊ का केला गेलाय, असं वाटतं.
का पाहावा - परेश मोकाशीची लव्हस्टोरी म्हणून अन् मराठीतील नवी प्रॉमिसिंग जोडी आलीय म्हणून
का टाळावा - जरा लाऊड आहे... सर्वच बाबतीत
थोडक्यात काय - इरसाल धमाल नमुनेदार पात्रांची खमंग पुणेरी मिसळ
या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स