चरणसिंग पथिक यांच्या दो बहने या लघुकथेवर हा सिनेमा बेतला आहे. चुटकी आणि बडकी या दोन बहिणी. आई लहानपणीच गेल्यानं वडिलांनी अत्यंत प्रेमाने त्यांना वाढवलेलं. पण या दोन्ही मुली म्हणजे, एकमेकींच्या कमाल वैरी आहेत. तितक्याच मोकळ्या आणि दबंग आहेत. यांच्या भांडणाची ही गोष्ट वाढत्या वयानुसार वाढत जाणारं हे भांडण असल्यामुळे त्यात क्रमाक्रमाने नव्या नव्या व्यक्तिरेखा अॅड होत जातात. त्यामुळे या भांडणाची छटाही बदलते. त्याचप्रमाणे त्याची व्याप्तीही वाढते.
छायांकन, संगीत, संकलन या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट आपल्या अपेक्षा पूर्ण करतो. मुद्दा आहे तो किंचित तोचतोचपणा येतो त्याचा. शेवटी दोघींचं भांडण केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांच्यातले वाद, संवाद याचा तोचतोचपणा जाणवतो. पण तो काही काळ. ही गोष्ट लवकर पुढे सरकल्याने त्याचा कंटाळा येत नाही.
या चित्रपटात बढकीची भूमिका साकारणारी राधिका मदन हे सरप्राईज आहे. यापूर्वी काही टीव्ही मालिकांमधून आपण तिला पाहिलं होतं. आता या चित्रपटातून तिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिने अत्यंत आत्मविश्वाासाने आपली भूमिका निभावली आहे. तितकीच कौतुकाची थाप सान्या मल्होत्रालाही. दोघींच्या अभिनयामुळे हा सिनेमा खिळून राहतो. या दोघींसह सुनील ग्रोव्हर, विजय राज यांच्या भूमिकाही उत्तम झाल्या आहेत.
एकूणात हा सिनेमा पाहताना मजा येते. समजायला सोपा. खुसखुशीत आाणि दोघींचा संघर्ष असल्यामुळे कमालीचा वेगवान असा हा सिनेमा बनला आहे. या चित्रपटाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळताहेत 3 स्टार्स