मुंबईः खागजी आयुष्यातील घुसमटीमुळे छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना अंधेरीमध्ये घडली आहे. बॉयफ्रेंडसोबत झालेला वाद आणि खाजगी आयुष्यातील अडचणी या मॉडेलच्या मृत्यूचं कारण असल्याचं बोललं जात आहे.

 

 

बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत नाव कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक जण मुंबईची वाट धरतात. मात्र हे स्वप्न पूर्ण करता करता अनेकांच्या आयुष्याचा प्रवास अर्ध्यावरच थांबतो. ही अभिनेत्री देखील याच परिस्थितिचा बळी असण्याची शक्यता आहे.

 

का केली आत्महत्या?

मॉडेल करमजीत कौर उर्फ नेहा बॉलिवूडमध्ये करीअर करण्याचं स्वप्न घेऊन दिल्लीहून मुंबईत आली. पण करमजीतचं स्वप्न अर्धवट राहिलं. काल रात्री करमजीतने अंधेरीतल्या सहजीवन सोसायटीत पंख्याला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. छोटा पडद्यावरुन बॉलीवूडमध्ये जाण्याची धडपड आणि खासगी आयुष्याची घुसमट यातच करमजीतचा अंत झाला.

 

 

करमजीत तिचा प्रियकर दीपेंद्रसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. तिला दीपेंद्रसोबत लग्न करायचं होतं आणि याच कारणावरुन तिचं दीपेंद्रसोबत काल रात्री भांडण झालं. पण दीपेंद्र घराबाहेर गेल्यानंतर तिने स्वत:ला कोंडून घेतलं. त्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. करमजीतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी दीपेंद्रची देखील चौकशी सुरु केली आहे.

 

 

जिया खान, प्रत्युषा बॅनर्जी आणि आता करमजीत कौर. सिनेसृष्टी आणि छोट्या पडद्यावरची ही अशी नावं आहेत, जी मृत्यूनंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामुळं आयुष्यासाठी केवळ पैसा आणि प्रसिद्धीच नव्हे, तर खासगी आयुष्याची स्थिरताही गरजेची असते, हेच या घटनांवरुन लक्षात येतं.