गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली भेट
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2019 04:47 PM (IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कँडी रूग्णालयात जाऊन गानसम्रात्री लता मंगेशकरांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांची प्रकृती आधीच्या तुलनेत उत्तम असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. लतादीदी लवकरात लवकर ठणठणीत होऊन घरी कधी परततील याची आम्ही वाट पाहत आहोत, असंही त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन गानसम्रात्री लता मंगेशकरांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्यांना वयोमानानुसार इन्फेक्शन झाल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. Raj Thackeray Meets Lata Didi | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लता मंगेशकर यांच्या भेटीसाठी रुग्णालयात | ABP Majha दरम्यान गुरुवारी राज ठाकरे यांनी ट्विट करत त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय, असं ते म्हणाले. “दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतो”, अशा आशयाचं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्या औषधोपचांराना योग्य प्रतिसाद देत असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.