एकीकडे मराठी कलाकार राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले. सगळ्यांना मदतीसाठी आवाहन केलं. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी पूरग्रस्तांकडे पाठ फिरवली. याच मुद्द्यावरुन अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे निशाणा साधला.
अमेय खोपकर यांनी पुरानंतर समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाच्या मोठेपणाचं कौतुक केलं. तर त्याचवेळी 'लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है,' असं म्हणत हिंदी कलाकारांवर टीका केली. ते लिहितात,
"महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून जे सांगतात ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही?
लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है...
कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असं म्हणतात. पण इथे प्रश्न गंभीर आहे, स्वत:ची मसीहा अशी प्रतिमा पडद्यावर रंगवणाऱ्या या स्टार्सना नेमका स्वत:च्या कर्मभूमीचाच कसा विसर पडतो हाच प्रश्न सतावतोय, आणि संतापही येतोय. असो, आम्ही आमचं काम करत राहू. आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू, यात कधीच खंड पडणार नाही.
अमेय खोपकर
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना