अक्षयचं 'मंगलमय मिशन', पाच दिवसांत 100 कोटींचा गल्ला
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2019 05:22 PM (IST)
पहिली भारतीय 'स्पेस फिल्म' असा लौकिक मिळवलेल्या 'मिशन मंगल' या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरील 'मिशन' मंगलमय ठरलं आहे.
मुंबई : पहिली भारतीय 'स्पेस फिल्म' असा लौकिक मिळवलेल्या 'मिशन मंगल' या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरील 'मिशन' मंगलमय ठरलं आहे. भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेवर आधारीत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. गुरुवारी (15 ऑगस्ट ) भारताने 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी 'मिशन मंगल' प्रदर्शित करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा चित्रपटाला मोठा फायदा झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'मिशन मंगल'ने तब्बल 29.16 कोटी रुपयांची कमाई केली. तर गेल्या पाच दिवसांत चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी चित्रपटाने 17.28 कोटी, शनिवारी, 23.58 कोटी, रविवारी 27.54 कोटी आणि सोमवारी 8.91 कोटी रुपयांची कमाई केली. पाच दिवसांमध्ये मिळून मिशन मंगलने 106.47 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. REVIEW | मिशन मंगल - मंगल हो 'मिशन मंगल' सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या जॉन एब्राहमच्या 'बाटला हाऊस' या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. 'मिशन मंगल' बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत असताना 'बाटला हाऊस'नेदेखील पाच दिवसात 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.