मुंबई : 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी त्याची डोकेदुखी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना सहन करावी लागत आहे. कारण रिंकू राजगुरूच्या वेब पेजवर सुभाष देसाई यांचा मोबाईल नंबर रिंकूचा नंबर म्हणून झळकला आहे.
त्यामुळे सुभाष देसाईंना अभिनंदनाचे हजारो फोन येऊ लागले. बरं हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं असतं तर ठीक, पण 'सॉरी राँग नंबर आहे' असं सांगूनदेखील देसाईंची खरी पंचाईत तेव्हा होते, जेव्हा समोरचा कॉलर त्यांना विचारतो की 'मग तुम्ही कोण बोलताय?'
चार-चौघात किंवा कुठल्या कार्यक्रमात सारखं 'मी उद्योग मंत्री बोलतोय' हे सांगणं सुद्धा त्यांना कठीण होऊन बसलं.
थेट मंत्री महोदयांचा नंबर एखाद्या लोकप्रिय नायिकेच्या संकेतस्थळावर येणं, हा नक्कीच योगायोग नसावा. हा प्रकार नजरचुकीने झाला की कोणाचा खोडसाळपणा याचा थांगपत्ता अजून लागलेला नसला, तरी योग्य ठिकाणी तक्रार करून या कॉल्सचा मी बंदोबस्त केल्याचं स्पष्टीकरण सुभाष देसाईं यांनी दिलं आहे.