मीनाक्षी थापा हत्या : सुनावणी पूर्ण, दोषींना उद्या शिक्षा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 10 May 2018 03:23 PM (IST)
बॉलिवूडमध्ये नाम कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या एका उदयोन्मुख तरुणीची साल 2012 मध्ये हत्या करण्यात आली होती.
मुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापाच्या मारेकऱ्यांच्या शिक्षेवरील सुनावणी पूर्ण झाली असून सत्र न्यायालय दोन्ही दोषींना उद्या शिक्षा सुनावणार आहे. मीनाक्षी थापाचं हत्याकांड ही रेअरेस्ट ऑफ रेअर घटना असल्याचा दाखला देत सरकारी पक्षाने दोन्ही दोषींसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. अतिशय थंड डोक्याने अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीनने मीनाक्षीची निर्घृणपणे हत्या केली होती. मीनाक्षीच्या देहाची ओळख पटू नये यासाठी तिचं डोकं धडापासून वेगळं केलं. त्यानंतर तिचं धड आणि शीर दोन वेगळवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकलं. पैशाच्या हव्यासा पोटी या दोघांनी हे निर्घण हत्याकांड घडवलं. तसंच सुरुवातीपासूनच या दोघांनी मीनाक्षीची हत्या करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे या दोघांना फाशीपेक्षा कमी शिक्षा होऊ नये अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केली. न्यायाधीश एस. जी. शेट्ये उद्या (शुक्रवार, 10 मे) यासंदर्भात आपला निर्णय जाहीर करतील. काय आहे प्रकरण? बॉलिवूडमध्ये नाम कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या एका उदयोन्मुख तरुणीची साल 2012 मध्ये हत्या करण्यात आली होती. मीनाक्षी थापा हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेल्या अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने आयपीसी कलम 302, 361(अ), 120(बी), 201 आणि आयटी अॅक्ट अंतर्गत दोषी ठरवलं आहे. देहरादूनहून मुंबईत येण्याआधी 26 वर्षीय मीनक्षी थापा डान्स स्कूल आणि स्केटिंग स्कूलमध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करत होती. मुंबईत आल्यावर तिने फ्रँकफिनमध्येही कोर्स केला होता. आपल्या मेहनतीने तिने 'सहेर', '404' अशा काही हिंदी सिनेमांत छोटे छोटे रोल्सही मिळवले होते. मधुर भंडारकर यांच्या 'हिरोईन' या सिनेमाच्या सेटवर मीनक्षीची अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोन ज्युनिअर आर्टिस्टशी ओळख झाली. या दोघांना मीनाक्षीने आपण एका श्रीमंत घरातून असल्याची माहिती दिली. तसंच आपण केवळ आवड म्हणून बॉलिवूडमध्ये काम करत असल्याचं तिने या दोघांना सांगितलं. याचाच फायदा घेऊन अमित आणि प्रीतीने मीनाक्षीचं पैशांसाठी अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर त्यांनी थापा कुटुंबीयांकडून 15 लाखांची मागणी केली. मीनाक्षीच्या आईने कसेबसे 60 हजार रुपये जमा केले. यावरुन त्यांना मीनाक्षीच्या फोलपणाची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी अलाहबाद इथे मीनाक्षीचं डोकं धडापासून वेगळं करत तिची हत्या केली. मीनाक्षीचं धड अलाहबादच्या एका गटारात टाकून तिच्या मुंडक्यासह ही दोघं बसने गोरखपूरला रवाना झाली. पुढे चालत्या बसमधून त्यांनी मीनाक्षीचं मुंडकं रस्त्यात फेकून दिलं. जे आजवर पोलिसांना सापडलेलं नाही. मीनक्षीची हत्याकरुन अमित आणि प्रीतीने तिचा मोबाईल आणि एटीएम कार्ड आपल्या ताब्यात घेतलं होतं. जेणेकरुन तिच्या अकाऊंटमधील पैसे सहज काढता येतील. अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन हे दोघंही मूळचे अलाहबादचे. अमितचे वडील हे तिथे एक नामांकित वकील आहेत. अमितचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत. अमितला सुरुवातीपासूनच शानशौकीत राहण्याची आवड होती. तसंच त्याला फिल्मी दुनियेचं विलक्षण आकर्षण होतं. अमित अलाहबादमध्ये एक कोचिंग क्लास चालवायचा. तिथेच त्याची प्रीतीशी ओळख झाली. प्रीतीचे वडील तिथे एका शाळेत काम करतात. प्रीतीलाही फिल्मी दुनियेचं वेड होत. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. घरच्यांच्या विरोधाला कंटाळून एक दिवस दोघांनी अलाहबाद सोडलं आणि मुंबई गाठली आणि सिनेमात छोटीमोठी कामं करु लागले. पण मूळातच उंची राहणीमानाचं आकर्षण असल्याने लवकरच त्यांना पैशांची चणचण भासू लागली. मग झटपट पैसे कमवण्याच्या नादात असतानाच त्यांची मीनाक्षीशी ओळख झाली. मग झटपट श्रीमंतीच्या नादात त्यांनी मीनाक्षीचं आधी पैशांसाठी अपहरण केलं आणि त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली.