मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. एकीकडे अभिनेत्री सोनम कपूरच्या शाही लग्नाची चर्चा ताजी असताना, तिकडे अभिनेत्री नेहा धुपियाने गुपचूप लगीनगाठ बांधली आहे.


नेहाने तिचा जवळचा मित्र अंगद बेदीशी लग्न केलं. अंगद बेदी भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे सुपुत्र आहेत.

नेहा-अंगदने ‘सिक्रेट वेडिंग’नंतर सोशल मीडियावर ही खुशखबर आपल्या चाहत्यांना दिली. अंगद आणि नेहाने शीख पद्धतीने विवाह केला.

नेहा धुपिया 37 वर्षांची आहे, तर अंगद त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान म्हणजेच 35 वर्षांचा आहे.

गेल्या अनेक दिवसापासून बॉलिवूडमध्ये सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा आहे. सोनमने 8 मे रोजी आनंद अहुजासोबत लग्न केलं. त्या लग्नाची धामधूम अजून चालूच आहे.

असं असताना नेहा धुपियाने मात्र कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत गुप्तपणे अंगदसोबत लग्न केलं.

‘मिस इंडिया’ झाल्यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच विद्या बालनसोबत ती ‘तुम्हारी सुलू’ या सिनेमात झळकली होती.

अंगद बेदीनेही छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन-तापसी पन्नू यांच्यासोबत तो पिंक सिनेमात दिसला होता.